इंजिनिअरिंग झालेला तेलतुंबडे नक्षलींचा देशातील सर्वात मोठा नेता | Milind Teltumbde | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंजिनिअरिंग झालेला तेलतुंबडे नक्षलींचा देशातला सर्वात मोठा नेता

गडचिरोलीत चकमकीत ठार झालेला मिलिंद तेलतुंबडे हा लेखक आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांचा भाऊ आहे. तसंच मिलिंद तेलतुंबडेची पत्नी प्राध्यापक आहे.

इंजिनिअरिंग झालेला तेलतुंबडे नक्षलींचा देशातला सर्वात मोठा नेता

गडचिरोलीमध्ये शनिवारी सकाळी पोलीस आणि नलक्षलींमध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीत तब्बल २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातलं आहे. त्यानंतर आता या प्रकरणाबाबत एक मोठी माहिती समोर आली असून, या घटनेत भीमा कोरेगाव हिंसाचारातील आरोपी मिलिंद तेलतुंबडेचाही मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. यावेळी काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाल्याचं समोर आलं आहे.

मिलींद तेलतुंबडे हा वणीपासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या राजूर (इजारा) येथील रहिवासी होता. त्याचे घरगुती नाव अनिल तर शैक्षणिक दस्तऐवजातील नांव मिलिंद असे आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले असून महाविद्यालयीन शिक्षण वणीत झाले. मिलिंद तेलतुंबडे हा इंजिनिअर होता. त्याने वेकोलीत काहीकाळ नोकरी केली आहे. तो पदामापूर, दुर्गापूर येथे कर्तव्यावर असताना आयटक युनियन मध्ये सामील झाला. जनरल सेक्रेटरी वणी उत्तरची जबाबदारी पार पाडली. मात्र, या दरम्यान तो नक्षल चळवळीत सक्रिय झाला.

नोकरी सोडण्याचा निर्णय घेत पूर्णवेळ नक्षल चळवळीत सक्रिय राहत असल्याचे घरच्या मंडळींना सांगितले. त्यानंतर तो 1996 पासून आजपर्यंत वणीत परतला नाही. त्याची पत्नी प्राध्यापक असून चंद्रपूर येथे वास्तव्यास आहे. तो लेखक, प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांचा भाऊ आहे. त्याने भाकप माओवादी पक्षाचा महाराष्ट्र सचिव म्हणूनही काम केलं आहे. नक्षली नेत्यांमधल्या सर्वात वरिष्ठ नेत्यांपैकी तो एक होता. दलित सेंट्रल कमिटीचा पहिला दलित सदस्य होता.

हेही वाचा: नक्षलवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार; आणखी तिघांना कंठस्नान?

इंजिनिअरिंग झालेला मिलिंद तेलतुंबडे हा गेल्या ३० वर्षांपासून नक्षली चळवळीत होता. यवतमाळ जिल्ह्यातील मूळच्या वणी तालुक्यात असलेल्या राजूर इथंला तो रहिवासी होता. मिलिंद तेलतुंबडे अनेक टोपणनावांनी ओळखला जात होता. सह्याद्री, ज्योतिराव, श्रीनिवास, दिपक, एम अशी अनेक नावे त्याला होता. माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा राज्य सचिव म्हणूनही त्याने काम केलं होतं.

महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ झोन स्थापन करण्यात मिलिंद तेलतुंबडेची महत्त्वाची भूमिका होती. या झोनचा तो सर्वात मोठा नेता होता. काही दिवसांपूर्वी राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात सुरजागड खाणी विरोधात आंदोलनाबाबत टीका करणारे पत्र व्हायरल झाले होते. त्यात नक्षल्यांचा प्रवक्ता म्हणून श्रीनिवासची सही होती, पण ते पत्र सह्याद्री म्हणजेच मिलिंद तेलतुंबडेने लिहिल्याचं समोर आलं होतं.

मिलींद तेलतुंबडेला सगळ्यात मोठा नक्षली कमांडर असल्याचं मानलं जात होतं. त्याला ठार करणं हे महाराष्ट्र पोलिसांचं मोठं यश मानलं जातं आहे. त्यामुळे आता नक्षली चळवळीला उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने हे पोलिसांचा मोठं पाऊल मानलं जातं आहे. भीमा कोरेगाव हिंसाचारातील आरोपी मिलिंद तेलतुंबडे यांच्यासह किमान २६ नक्षलवाद्यांना शनिवारी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाले. या कारवाईत चार पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौम्या मुंडे यांच्या नेतृत्वाखाली C-60 पोलीस कमांडो पथक शोध मोहीम राबवत असताना मार्डिनटोला वनपरिक्षेत्रातील कोरची येथे गोळीबार झाला.

loading image
go to top