
पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टाला 'जोक' म्हणणाऱ्यांवर अर्थमंत्री संतापल्या; म्हणाल्या...
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाला 'विनोद' संबोधण्याच्या तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
निर्मला सीतारामन म्हणाल्या की, पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट हा एक विनोद आहे, असं तुम्ही कसे सांगू शकता? त्यासाठी प्रत्येक राज्याने हातभार लावला पाहिजे. तुम्ही कोणावर हसत आहात? २०१४ मध्ये तेलंगणाचे कर्ज ६० हजार कोटी रुपये होते, पण गेल्या सात-आठ वर्षांत ते तीन लाख कोटींच्या पुढे गेले आहे.
केसीआर यांनी पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था हा एक विनोद आणि 'मूर्खपणा' असल्याचे वक्तव्य करून वाद निर्माण केला होता. हे उद्दिष्ट खूप मोठे असायला हवे होते, असही ते म्हणाले होते. 2025 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचवण्यात काहीही विशेष नाही. एक सामान्य "क्लार्क" याचा हिशोब देऊ शकतो, असे ते एका व्हायरल व्हिडिओमध्ये म्हणताना दिसतात.
"तुम्ही काय अतिरिक्त मेहनत घेत आहात? काहीही नाही, जर तुम्ही हे करू शकत असाल, तुमच्याकडे नाविन्यपूर्ण कौशल्य असेल, तुम्ही गतिमान सरकार असाल तर कृपया सिंगापूरचे ली कुआन यू यांच्या बरोबरीने डेंग शियाओपिंग यांच्या धर्तीवर चीनसारखे काहीतरी करा. ही पाच ट्रिलियन डॉलरची नव्हे, तर मोठी अर्थव्यवस्था आहे, असे केसीआर यांनी म्हटलं होतं.