
Rahul Gandhi : ये रिश्ता क्या कहलाता है? ''अदानी यांच्या कंपनीत 20 हजार कोटी कोणाचे?'' राहुल गांधीचा प्रश्न कायम...
Rahul Gandhi Disqualification : गुजरातच्या सुरत न्यायालयाने गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.
संसदेतून अपात्र ठरल्यानंतर राहुल गांधी यांनी शनिवारी 25 मार्च रोजी प्रथमच प्रसारमाध्यमांसमोर आले. ते म्हणाले की, भारताच्या लोकशाहीवर हल्ला होत आहे, रोज नवनवीन उदाहरणे पाहायला मिळत आहेत.
ते पुढे म्हणाले, "अदानी यांची शेल कंपनी आहे, त्यात कोणीतरी 20,000 कोटी रुपये गुंतवले आहेत, ते अदानी यांचे पैसे नाहीत, ते दुसऱ्याचे पैसे आहेत, प्रश्न आहे की हे 20,000 कोटी रुपये कोणाचे आहेत. अदानी आणि मोदी यांच्यातील संबंधांबद्दल मी संसदेत सविस्तर बोललो. हे नाते नवीन नाही, हे नाते जुने आहे. मी याबद्दल प्रश्न विचारले आहेत.''
'मी प्रश्न विचारणे थांबवणार नाही' :
राहुल गांधी म्हणाले, "मला कशाचीही भीती वाटत नाही, मला तुरुंगात टाकून तुम्ही मला घाबरवू शकत नाही, हा माझा इतिहास नाही... मी भारतासाठी लढत राहीन. मला संसदेत बोलू दिले जात नाही. संसद अध्यक्षांना मी पत्र लिहिले, पण प्रतिसाद मिळाला नाही. माझे भाषण संसदेतून काढून टाकण्यात आले, पण मी प्रश्न विचारणे सोडणार नाही'' असे राहुल गांधी म्हणाले.
अपात्र ठरल्यानंतर राहुल गांधी यांनी सर्वप्रथम आपण कोणतीही किंमत चुकवण्यास तयार तयार असल्याचे सांगितले. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, "मी भारताच्या आवाजासाठी लढत आहे. मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे."
कोणत्या प्रकरणात शिक्षा?
सुरतच्या एका न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांच्या मोदी आडनावाबद्दलच्या टिप्पणीबद्दल 2019 मध्ये दाखल केलेल्या गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
मात्र, सुनावणीदरम्यानच न्यायालयाने राहुल गांधींना जामीन मंजूर केला आणि शिक्षेच्या अंमलबजावणीला 30 दिवसांची स्थगिती दिली, जेणेकरून काँग्रेस नेते या निकालाला आव्हान देऊ शकतील. 2019 मध्ये कर्नाटकमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले होते, "सर्व चोरांचे आडनाव मोदी का आहे?"