
चिंताजनक! लशींचे सुरक्षा कवच भेदणारा व्हेरिएंट आढळला
नवी दिल्ली : जगभर कोरोना संसर्गाची तीव्रता कायम असताना आता भविष्यामध्ये हे संकट अधिक गहिरे होण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेसह अन्य काही देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडला असून तो पूर्वीच्या अन्य उपप्रकारांपेक्षा अधिक संसर्गजन्य असू शकतो. यामुळे लसीकरणानंतर मिळालेले सुरक्षा कवच देखील गळून पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दक्षिण आफ्रिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीज (एनआयसीडी) आणि क्वाझुलू- नॅटल रिसर्च इनोव्हेशन अँड सिक्वेन्सिंग प्लॅटफॉर्म (केआरआयएसपी) या दोन आघाडीच्या संशोधन संस्थांनी यंदा मे महिन्यात ‘सी.१.२’ हा व्हेरिएंट शोधून काढला आहे. हा व्हेरिएंट चीन, काँगो, मॉरेशियस, इंग्लंड, न्यूझीलंड, पोर्तुगाल आणि स्वित्झर्लंडमध्येही आढळून आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा: जॅकलिन फर्नांडिसच्या मागे ईडी; तब्बल पाच तास कसून चौकशी
कोरोनाच्या ‘सी.१’ या व्हेरिएंटपेक्षाही ‘सी.१.२’ हा व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य आहे. दक्षिण आफ्रिकेतील संसर्गाच्या पहिल्या लाटेमध्ये प्रामुख्याने हाच व्हेरिएंट आढळून आला होता. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे म्युटेशन होण्याचा धोका अधिक असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
हेही वाचा: अनिल परबांचे निकटवर्तीय अधिकारी खरमाटे यांच्यावर ईडीचा छापा
जीनोममध्ये सातत्याने वाढ
दक्षिण आफ्रिकेमध्ये ‘सी.१.२’ या व्हेरिएंटच्या जीनोममध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. बेटा आणि डेल्टा व्हेरिएंटमध्ये अशाच प्रकारची स्थिती पाहायला मिळाली होती. या व्हेरिएंटच्या म्युटेशनचे प्रमाण हे दरवर्षी ४१.८ टक्के एवढे आहे. अन्य व्हेरिएंटच्या म्युटेशनच्या दरापेक्षा त्याचे प्रमाण हे जवळपास दुप्पट असल्याचे बोलले जाते.
आणखी लाखोंचा जीव धोक्यात
यंदाच्या डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोना संसर्गामुळे युरोपमध्ये २ लाख ३६ हजारांपेक्षाही अधिक लोक मरण पावण्याचा गंभीर इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) दिला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाचा मंदावलेला वेग याला कारणीभूत ठरू शकतो अशी भीती व्यक्त होते आहे. युरोपात अनेक देशांमध्ये कोरोना संसर्ग वाढत चालला असून लसीकरण न झालेल्या लोकांना याचा धोका निर्माण झाल्याचे आढळून आले आहे.
Web Title: Why Covids C 1 2 Variant Is Worrying For India
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..