
भारतात 16 जानेवारीपासून आपत्कालीन वापरासाठी म्हणून लसीकरणास सुरवात होत आहे.
नवी दिल्ली : भारतात 16 जानेवारीपासून आपत्कालीन वापरासाठी म्हणून लसीकरणास सुरवात होत आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरणामध्ये तीन कोटी लोकांना लस देण्यात येणार आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स यांना ही लस देण्यात येणार आहे. भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला मान्यता मिळाली आहे. या लसीचे वितरण सध्या देशभर करण्यात आले असून लसीकरणाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारत बायोटेकची लस संशयाच्या भोवऱ्यात आहे. या लसीसंदर्भात उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांना आता कंपनीच्या डायरेक्टरनी सडेतोड उत्तरं दिली आहेत.
आमच्याकडे जितका डेटा आहे तितका इतर कोणत्या लसीकडे आहे का? असा सवाल भारत बायोटेकचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. क्रिष्णा इल्ला यांनी केला आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला अलिकडेच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजूरी मिळाली आहे. मात्र, त्यांनी विकसित केलेल्या कोरोना लसीवरुन सध्या देशात उलटसुलट चर्चा आहे. inactivated virus platform वर आधारित ही लस आहे. या लसीचे 55 लाख खुराक सध्या भारतातील पहिल्या टप्प्यातील लसीकरणात वापरण्यात येणार आहेत.
हेही वाचा - लसीकरणाआधी केंद्र सरकारची राज्यांना विशेष सूचना; तुमच्यासाठीही महत्त्वाचे
या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे. ही चाचणी तब्बल 25,800 व्हॉलेंटीअर्सवर करण्यात येत असून या चाचणीचे निष्कर्ष येणे अद्याप प्रलंबित आहे. निष्कर्ष अद्याप आलेले नसताना या लसीला लसीकरणासाठी परवानगी कशी काय देण्यात येऊ शकते? असे प्रश्न विचारले जात आहेत. याबाबत मानवी वापरासाठीच्या सुरक्षिततेबाबत खात्री देताना डॉ. कृष्णा इल्ला यांनी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील माकडांवरील आणि घुशीवरील यशस्वी प्रयोगांचा उल्लेख केला. माकडांवरील चाचण्यांमुळे लसीच्या सुरक्षिततेबाबत खात्री मिळाली आहे. कारण लसीकरणानंतरच्या 30 दिवसांनंतर आम्ही माकडांमध्ये विषाणू सोडतो, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यातील चाचण्यांच्या यशस्वीतेमुळे ही लस सुरक्षित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
मात्र, भारत बायोटेकबाबत आणखी एक वाद सध्या सुरु आहे. तो म्हणजे क्लिनीकल ट्रायलमध्ये भाग घेतलेल्या भोपाळमधील व्हॉलेंटीअरचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याबाबत बोलताना सुचित्री इल्ला यांनी म्हटलं की, या व्हॉलेंटीअरचा मृत्यू लसीमुळे झाला आहे, असे दर्शवणारी कोणतीही बाब आढळली नाहीये. हृदयविकाराच्या झटक्याने हा मृत्यू झाल्याचे FIR सांगतो.
भोपाळमधील स्वयंसेवक क्लिनिकल ट्रायल्समध्ये भाग घेत आहेत हे त्यांनाच ठाऊक नव्हतं, या प्रश्नाला उत्तर देताना इल्ला म्हणाले की सर्व चाचण्या पार पाडण्यासाठी दुसऱ्या एका कंपनीने नियुक्त केले होते ज्यांनी योग्य प्रोटोकॉल पाळूनच ट्रायल्स घेतल्या आहेत.
या देशात प्रत्येकजण संशयखोर का आहे? असा सवालही त्यांनी केला.