esakal | बायकोच्या 'झुरळ फोबिया'ने बदलली तब्बल 18 घरे; वैतागलेल्या नवऱ्याकडून घटस्फोटाचा अर्ज

बोलून बातमी शोधा

Divorce
बायकोच्या 'झुरळ फोबिया'ने बदलली तब्बल 18 घरे; वैतागलेल्या नवऱ्याकडून घटस्फोटाचा अर्ज
sakal_logo
By
विनायक होगाडे

भोपाळ : लग्न झाल्यावर काही कारणाने पती आणि पत्नीचं जमलं नाही तर ते विभक्त होण्याचा पर्याय निवडतात. याला कारणे काहीही असू शकतात. मात्र, यासंदर्भातील मध्य प्रदेशमधून आता एक वेगळीच घटना समोर आली आहे. बायकोच्या झुरळाला घाबरण्याला वैतागून आता पतीने घटस्फोट मागितला आहे. पतीचं म्हणणं आहे की, लग्नानंतर तीन वर्षांमध्ये त्याने या कारणामुळे 18 वेळा घर बदललं आहे. मात्र, ना बायकोची भीती कमी झाली ना यावर काही उपाय करण्याबाबतीत ती राजी आहे. या दाम्पत्याचं लग्न 2017 साली झालं होतं. पतीचं म्हणणं आहे की, बायकोच्या या 'झुरळ फोबिया'बाबत त्याला 2018 मध्ये पहिल्यांदा समजलं जेंव्हा की किचनमध्ये काम करत असताना अचानकच धावत आणि किंचाळत बाहेर आली. तिने किंचाळत म्हटलं की, किचनमध्ये झुरळ आहे. थोड्यावेळाने झुरळ तिथून निघून गेलं मात्र लाख प्रयत्न करुनही त्याची बायको त्या किचनमध्ये गेलीच नाही. सरतेशेवटी पतीला ते घर बदलावं लागलं मात्र, बायकोची भीती काही केल्या कमी झाली नाही.

हेही वाचा: ममता बॅनर्जींचं गांधी मूर्तीसमोर धरणे आंदोलन; बसल्या बसल्या चित्रेही काढली

पतीने म्हटलंय की झुरळ पाहताच पत्नी एवढ्या जोराने ओरडते की कुटुंबातील इतर सदस्य देखील तिच्या या ओरडण्यानेच घाबरुन जातात. झुरळ पाहताच ती घर बदलण्याच हट्ट करते. तिच्या या हट्टापायी पतीने आतापर्यंत 18 वेळा घरे बदलली आहेत. त्यामुळे नातेवाईक आणि मित्रमंडळी देखील यामुळे नवऱ्याची चेष्टामस्करी करत आहेत. पतीने असंदेखील म्हटलं की, पत्नीला अनेक डॉक्टरांकडे नेण्यात आलं. इतकंच काय तर दिल्लीमधील एम्स हॉस्पिटलमधील मनोवैज्ञानिकांकडून देखील तिच्यावर उपचार केले. मात्र, पहिले पाढे पंच्चावन्नच! पत्नी ती औषधे घ्यायला देखील तयार नाहीये. त्याने पत्नीचं कौन्सिलिंग देखील केलं. मात्र, तिच्या या झुरळ फोबियावर काहीही परिणाम झाला नाहीये. आणि सरतेशेवटी आता पतीने आपले हात जोडले आहेत. त्याने आता थेट घटस्फोटासाठीच अर्ज केला आहे. तर दुसरीकडे पत्नीचं म्हणणं आहे की, पती तिच्या समस्येला नीट समजूनच घेत नाहीये. तिला फक्त झुरळाची भीती वाटते मात्र, पती मला वेडसर ठरवण्याच्या प्रयत्नात आहे.