भाजपसाठी जीवही देईन : शत्रुघ्न सिन्हा

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 जुलै 2018

''जोपर्यंत मी भाजपमध्ये असेल तोपर्यंत भाजपसाठी मी जीव देईन. अडचणीत असलेल्या भाजपसोबत मी असेन. अविश्वास प्रस्तावाविरोधात मी मतदान करेन. तथाकथित अडचणीत सापडलेल्या पक्षासोबत राहीन''.

- शत्रुघ्न सिन्हा, बंडखोर खासदार, भाजप

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सतत घोषणाबाजी करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी आता मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर भाष्य केले. ते म्हणाले, ''जोपर्यंत मी भाजपमध्ये असेल तोपर्यंत भाजपसाठी मी जीव देईन. अडचणीत असलेल्या भाजपसोबत मी असेन. अविश्वास प्रस्तावाविरोधात मी मतदान करेन. तथाकथित अडचणीत सापडलेल्या पक्षासोबत राहीन''.'

तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) केंद्रातील मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला. तसेच टीडीपीने पक्षातील सर्व खासदारांना पत्र लिहिले असून, या खासदारांना पाठिंब्यासाठी आवाहनही करण्यात आले आहे. आंध्रप्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा ही मागणी मान्य करण्यात आली नसल्याने अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला. मोदी सरकारच्या विविध निर्णयांमुळे शत्रुघ्न सिन्हांकडून सरकारवर उघडपणे टीका केली जात असते. 

दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता असून, त्यांना काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) किंवा आम आदमी पक्षाकडून (आप) उमेदवारी मिळण्याची शक्यता राजकीय वतुर्ळात वर्तवली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will give life to BJP says Shatrughan Sinha