यूपी, बिहारमधील पोटनिवडणुकीमुळे विरोधकांना संजीवनी मिळणार ?

योगेश कानगुडे
बुधवार, 14 मार्च 2018

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेश आणि बिहार येथील पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. लोकसभेच्या तिन्ही जागेवर भाजपचा दारुण पराभव झाला आहे. यातील उत्तर प्रदेशमधील दोन जागांवरील लढत ही भाजपासाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. योगी आदित्यनाथ यांची उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी तर केशवप्रसाद मौर्य यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर दोघांनीही खासदारकीचा राजीनामा दिला होता. योगी आदित्यनाथ हे गोरखपूर तर केशवप्रसाद मौर्य हे फुलपूरमधून लोकसभेवर निवडून गेले होते. त्या दोन्ही जागांवर भाजपचा पराभव झाल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेश आणि बिहार येथील पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. लोकसभेच्या तिन्ही जागेवर भाजपचा दारुण पराभव झाला आहे. यातील उत्तर प्रदेशमधील दोन जागांवरील लढत ही भाजपासाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. योगी आदित्यनाथ यांची उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी तर केशवप्रसाद मौर्य यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर दोघांनीही खासदारकीचा राजीनामा दिला होता. योगी आदित्यनाथ हे गोरखपूर तर केशवप्रसाद मौर्य हे फुलपूरमधून लोकसभेवर निवडून गेले होते. त्या दोन्ही जागांवर भाजपचा पराभव झाल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. तसेच या विजयामुळे भाजपाविरोधात एकटवण्याच्या तयारीत असलेल्या विरोधकांचे मनोबलही वाढण्यास मदत होणार आहे. या निवडणुकीकडे २०१९ च्या लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहण्यात येत होते. 

त्रिपुरात भाजपने सत्ता मिळवली वा ईशान्य भारतात कॉग्रेससह डाव्यांची पिछेहाट झाली. पण त्याच्या आधी राजस्थानात भाजपाने जबरदस्त पराभव पाहिला आहे. तिथल्या दोन लोकसभा व एक विधानसभेच्या जागा भाजपाने गमावल्या. त्याही मोठ्या फ़रकाने गमावल्या होत्या. तुलनेने मध्यप्रदेशातील दोन विधानसभा जागा कॉग्रेसने जिंकल्या असल्या तरी त्या कॉग्रेसच्याच होत्या आणि त्या राखतानाही कॉग्रेसचे मताधिक्य घटलेले आहे. या तुलनेत रविवारी उत्तरप्रदेश व बिहारमध्ये झालेले पोटनिवडणूकीचे मतदान खरे कसोटीचे मानण्यात येत होते. कारण या दोन राज्यात मिळून १२० लोकसभेच्या जागा आहेत आणि वर्षभरात देशभर त्यासाठीच मतदान व्हायचे आहे. या १२० पैकी शंभराहून अधिक जागा भाजपाने मागल्या खेपेस जिंकल्या होत्या आणि आजही तितका मोदी लाट त्या परिसरात कायम आहे किंवा नाही, त्याचा निकाल  बुधवारच्या मतमोजणीतून लागणार होता. नुसत्या या जागा कोणी जिंकल्या, इतकेच त्याचे महत्व नाही. दोन महत्वाच्या राजकीय बदलांची सुद्धा तिथे कसोटी लागणार होती. 

उत्तरप्रदेशात सपा-बसपा यांनी एकत्र येण्याचा प्रयोग केला आहे, त्याला जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो, यावर अखिलेश व मायावती भविष्यात एकत्र येण्याचा निर्णय अवलंबून होता.तर बिहारमध्ये विधानसभेत केलेली आघाडी मोडून पुन्हा भाजपाकडे आलेल्या मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या निर्णयाला मतदार कसे समर्थन देतात हे पाहणे महत्वाचे होते. भाजपा वा कॉग्रेसला देशाची सत्ता मिळवण्यासाठी ज्या उत्तर भारतीय मतांचा आधार लागतो तो निर्णय या पोटनिवडणुकांमधून होणार होता. पोटनिवडणुकीत बहुजन समाज पक्षाने समाजवादी पक्षाला पाठिंबा जाहीर करत नवीन राजकीय समीकरणाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले होते. 

बिहारमध्ये गेल्यावेळी  नितीश कुमार, लालू प्रसाद  यादव आणि काँग्रेस यांनी एकत्र मिळून निवडणूक लढवली होती. या महाआघाडीला यशही मिळले होते. भाजपला मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. परंतु नितीशकुमार हे काँग्रेस आणि लालू प्रसाद यांना सोडून भाजपच्या गोटात दाखल झाले. त्यामुळे तेथील राजकीय समीकरणांत प्रचंड बदल झाला आहे. मतदार कोणाला कौल देणार याची  चाचणी होती. बिहारमधील जनतेने लालू प्रसाद याना साथ दिलेली दिसते आहे. भाजपबरोबर नितीश कुमार यानांही जोरदार झटका बसला आहे. 

राजस्थान आणि मध्यप्रदेश या महत्वाच्या राज्यांतील पोटनिवडणुकांपाठोपाठ हा झालेला पराभव निश्चित भाजपसाठी चांगला नाही. उलट भाजपच्या प्रभावामुळे विरोधी पक्षांचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला दिसतो आहे. भाजपच्या पराभवामुळे विरोधकांना नवीन संजीवनी मिळाली असं म्हटलं वावगं ठरणार नाही.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will opposition get life after defeat of BJP in UP, Bihar ?