राजकारण सोडेन पण भाजपसोबत जाणार नाही; मायावतींचे स्पष्टीकरण

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 2 November 2020

समाजवादी पार्टीच्या उमेदवाराला हरवण्यासाठी भाजपला मत देण्यास काही हरकत नसल्याचे वक्तव्य बहुजन समाज पार्टीच्या (BSP) प्रमुख मायावती (Mayawati) यांनी केलं होतं.

लखनऊ- समाजवादी पार्टीच्या उमेदवाराला हरवण्यासाठी भाजपला मत देण्यास काही हरकत नसल्याचे वक्तव्य बहुजन समाज पार्टीच्या (BSP) प्रमुख मायावती (Mayawati) यांनी केलं होतं. पण, त्यांनी आता नवं वक्तव्य केलं आहे. भाजपसोबत कोणत्याही प्रकारची युती करण्यापेक्षा मी राजकीय निवृत्ती घेणे पसंत करेल, असं त्या म्हणाल्या आहेत. सोमवारी मायावती माध्यमांशी संवाद साधत होत्या. 

कोणत्याही निवडणुकीत बसपा भाजपसोबत युती करणे शक्य नाही. बसपा एका सांप्रदायिक पक्षासोबत निवडणूक लढवणार नाही. आमच्या पक्षाची विचारधारा सर्वधर्म हितायची आहे आणि भाजपची विचारधारा पूर्णपणे वेगळी आहे. बसपा सांप्रदायिक, जातिवादी आणि भांडवलवादी विचारधारेसोबत हात मिळवू शकत नाही, असं मायावती म्हणाल्या आहेत.  

मुकेश अंबानींना झटका! टॉप-10 श्रीमंतांच्या यादीतून दोन स्थानांनी घसरण

मायावती यांनी मागील आठवड्यात म्हटलं होतं की, विधानसभा, विधान परिषद आणि राज्यसभेसह भविष्यातील सर्व निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव निश्चित करण्यासाठी त्यांचा पक्ष भाजप किंवा अन्य पक्षाच्या उमेदवाराला मत देऊ शकते. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या सात जागांवर मंगळवारी निवडणुका होत आहेत. निवडणुकीला एक दिवस राहिला असताना मायावतींचे भाजपसंबंधीच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण आलं आहे.  

मायावतींनी स्पष्ट केलंय की, भाजपची विचारधारा त्यांच्या पक्षापेक्षा खूप वेगळी आहे. त्यामुळे भविष्यातील विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुकीसाठी पक्ष भाजपसोबत एकत्र येऊ शकत नाही. पोटनिवडणुकीत समाजवादी पार्टी आणि काँग्रेस आमच्या पक्षाविरोधात षडयंत्र करत आहेत. मुस्लीम समाजाला बसपापासून दूर करण्याचा त्यांचा डाव आहे. पण, बसपा भाजपसोबत जाऊ शकत नाही. आमचा विश्वास सर्वधर्म समभावावर आहे. त्यामुळे भाजपसोबत युती करण्यापेक्षा मी राजकीय निवृत्ती घेईन. 

बसपा एक विचारधारा आणि आंदोलनचा पक्ष आहे. भाजपसोबत सरकार होते, तेव्हाही मी कधीही तडजोड केली नाही. माझ्या कार्यकाळात कधीही हिंदू-मुस्लीम दंगा झाला नाही, याला इतिहास साक्ष आहे, असंही मायावती म्हणाल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will Retire But Not Ally With BJP said Mayawati