New Parliament : नव्या भवनात अधिवेशनाची शक्यता धूसर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Winter Session New Parliament

New Parliament : नव्या भवनात अधिवेशनाची शक्यता धूसर

नवी दिल्ली : संसदेचे यंदाचे हिवाळी अधिवेशन नवीन त्रिकोणाकृती संसद भवनातच होणार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्धार प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता अंधूक आहे. कारण नवीन संसद भवनाची इमारत उभी राहिली असली तरी या भव्य इमारतीतील ‘फिनिशिंग''ची अनेक कामे अद्याप अपूर्ण आहेत व नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत ती पूर्ण होणे केवळ अशक्य आहे.

या ऐतिहासिक इमारतीच्या कामात कोणतीही घाई परवडणार नाही, असे या कामात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या सूत्रांचे म्हणणे आहे. या स्थितीत हिवाळी अधिवेशनातील एखादा दिवस म्हणजे संविधान दिनाच्या बैठका नवीन इमारतीत घेऊन उर्वरित अधिवेशन सध्याच्या संसदेत चालविण्याचा पर्याय सरकारच्या मनात असल्याची निश्चित माहिती ‘सकाळ’ ला मिळाली आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन येत्या २१ नोव्हेंबरपासून (सोमवार) सुरू होण्याची शक्यता आहे. प्रथेनुसार २५ डिसेंबरच्या आत हे अधिवेशन संपवायचे असते. २०२० पासून नवीन संसदेचे बांधकामही २४ तास रात्रंदिवस सुरू आहे. ब्रिटिशांनाही सध्याचे संसद भवन बांधण्यासाठीही जवळपास सात वर्षे लागली होती. संसदेच्या नवीन इमारतीचे काही बांधकाम नियोजित वेळेच्या पुढे जाणार हे आता निश्चित मानले जात आहे.

लोकसभा व राज्यसभा सचिवालयांना अधिवेशन नवीन इमारतीत होईल याबाबतची कोणतीही सूचना सरकारकडून आलेली नसल्याची माहिती आहे. नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी संसदेची नवीन इमारत पूर्ण करण्याचे मोदी सरकारने लक्ष्य ठेवले होते.

मात्र तो मुहूर्त गाठणे अशक्य असल्याचे प्रत्यक्ष बांधकामात सहभागी असलेल्यांचे म्हणणे आहे. चोवीस तास सुरू असलेल्या संसद भवनाच्या इमारतीचे सिव्हीलचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रणा, विद्युत जोडणी, भिंतीवरील भव्य शिल्पे-भित्तिचित्रे, गालिचे आणि इतर गुंतागुंतीची अनेक कामे अजूनही अपूर्ण आहेत. ती डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत पूर्ण होऊ शकत नाहीत.

लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी अलीकडेच दिवाळीनिमित्त संसद भवन बांधकामात सहभागी असलेल्या अधिकारी व श्रमिकांची सदिच्छा भेट नुकतीच घेतली तेव्हा त्यांनाही वस्तुस्थिती सांगण्यात आली व घाईघाई करणे योग्य नव्हे, असेही सुचविण्यात आले अशी माहिती आहे. नवीन इमारत अर्थसंकल्पी अधिवेशनापर्यंत पूर्ण सज्ज होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांना आहे.

नवीन संसदेची इमारत सुसज्ज झाल्यानंतरही प्रत्यक्ष अधिवेशन सुरळीत चालावे आणि खासदारांना सर्व मदत मिळावी यासाठी सचिवालयांच्या कर्मचाऱ्यांना प्राथमिकदृष्ट्या प्रशिक्षित करण्यासाठी किमान १५-२० दिवस लागतील. यासाठी लोकसभा सचिवालय, राज्यसभा सचिवालय, नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटर, आयटीडीसी आणि हाऊस कीपिंग स्टाफसाठी मॉक ड्रिलचे आयोजन करावे लागेल. हिवाळी अधिवेशनाची प्रस्तावित तारीख पहाता हे सारे पूर्ण होणे अशक्य असल्याचे स्पष्ट आहे.

सरकारसमोर पर्याय

सध्याच्या स्थितीत सरकारसमोर दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे हिवाळी अधिवेशनातील राज्यघटना दिनासारखी (२६ नोव्हेंबर) एखादी महत्त्वाची बैठक नवीन संसदेत भरविणे. दुसरा पर्याय म्हणजे अलीकडच्या काही भीषण दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर नवीन संसदेतच हिवाळी अधिवेशन घेण्याचा हट्ट सोडून देणे. २०२३ मधील अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक व राष्ट्रपतींचे अभिभाषण व नंतरचे पूर्ण सत्र नवीन इमारतीत करणे.