हिवाळी अधिवेशनात लोकसभेत 68 तास 42 मिनिटे तर राज्यसभेत 64 तास 50 मिनिटे कामकाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parliament Session

मुदतीआधीच ६ दिवस गुंडाळलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत 68 तास 42 मिनिटे तर राज्यसभेच्या २५८ व्या अधिवेशनात 64 तास 50 मिनिटे कामकाज झाले.

Parliament : हिवाळी अधिवेशनात लोकसभेत 68 तास 42 मिनिटे तर राज्यसभेत 64 तास 50 मिनिटे कामकाज

नवी दिल्ली - मुदतीआधीच ६ दिवस गुंडाळलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत 68 तास 42 मिनिटे तर राज्यसभेच्या २५८ व्या अधिवेशनात 64 तास 50 मिनिटे कामकाज झाले, असे सरकारच्या वतीने आज सांगण्यात आले.

मुळातच गुजरात-हिमाचल प्रदेश व दिल्ली मनपाच्या निवडणुकांमुळे उशीरा सुरू झालेले यंदाचे हिवाळी संसद अधिवेशन जेमतेम १७ दिवसांचे होते. ते २९ डिसेंबरपर्यंत म्हणजे १७ बैठका इतके चालविण्याचा सरकारचा मानस होता. मात्र अधिवेशन मध्यावर येता येता अनेक खासदारांकडून नाताळ व नववर्षानिमित्त मुदतीआधीच म्हमजे २५ डिसेंबरपूर्वीच अधिवेशन संपवावे अशी जोरदार मागणी आली. दोन तीन विधेयके व अर्थसंकल्पीय पुवठ्या मागण्यांना मंजुरी या व्यतिरिक्त सरकारनेही अन्य महत्वाचे कामकाज प्रस्तावित केले नव्हते. परिणामी अधिवेशन आज गुंडालणार अशी चर्चा मागच्याच आठवड्यात सुरू झाली होती. सकाळ ने याबाबतचे वृत्त दिले होते.

7 डिसेंबरपासून सुरू झालेल्या या अधिवेशनाच्या तिसऱया कामकाजी दिवशीच अरुणाचल प्रदेशातील तवांग येथील यांगत्से येथे चिनी लष्करासोबत झालेल्या संघर्षाची बातमी `फुटली` आणि धिवेशनाचा शांत नूर पालटला. चीनच्या कुरापतीवरील चर्चेच्या मागणीवर विरोधक व चर्चा होऊ देणारच नाही यावर सरकार हे दोघेही ठाम राहिले. राज्यसभेत सरकारला अजूनही बहुमत नसल्याने येथे विरोधकांचा आवाज बुलंद असतो. परिणामी वरिष्ठ सभागृहातील वातावरणाचे तापमान जास्त राहिले. राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांचे हे पहिलेचअधिवेशन होते. त्यामुळे कामकाज चालविण्याबाबत विरोधक व काँग्रेसमध्येही सुरवातीला अनुकूल वातावरण होते. मात्र चर्चा करणार नाही हा सरकारचा पवित्रा व खुदद पीटासीन अधिकाऱयांकडूनच वेळोवेळी करण्यात आलेली टिप्पणी यामुळे अधिवेशनाचा रंग पालटला. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी धनखड यांच्यावरूनच अखेरचे दोन दिवस उग्र रूप धारण केले.

धनखड यांनी समारोपाच्या भाषणात सभागृहातील गदारोळाबाबत पुन्हा खंत व्यक्त करताना देसासमोर अनुकरणीय मानदंड स्थापित करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत धनखड यांनी हेही नमूद केले की आमच्या (संसद सदस्य म्हणून) जबाबदाऱया आम्ही ओळखत नाही व त्यानुसार संसदेत आचरण करत नही तोवर देशातील जनता संसदेकडे वेगळ्या नजरेने पाहील. कोवीड महामारीने पुन्हा डोके वर काढल्याच्या पार्श्वभूमीवर धनखड यांनी खासदारांना, कोवीड आरोग्य दिशानिर्देशांचे काटेकोर पालन करण्याचेही आग्रही आवाहन अखेरीस केले.

लोकसभा

लोकसभेच 13 बैठकांमध्ये सुमारे 97 टक्के कामाची उत्पादकता आणि 68 तास 42 मिनिटे काम झाले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले की, 7 डिसेंबरपासून सुरू झालेल्या 17 व्या लोकसभेच्या या 10 व्या अधिवेशनात 13 बैठका झाल्या, ज्यामध्ये 68 तास 42 मिनिटे काम झाले. या सत्रातील कार्य उत्पादकता सुमारे 97 टक्के होती. सभागृहाचे 102 टक्के कामकाज झाले.

राज्यसभेतील कामकाज

वरिष्ठ सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यापूर्वी सभापती जगदीप धनखर यांनी सांगितले की, या १३ दिवसांत राज्यसभेत कामकाज 64 तास 50 मिनिटांच्या प्रस्तावित कामकाजापैकी ६३ तास २० मिनीटे प्रत्यक्ष कामकाज झाले. १२० टक्के उत्पादकता राहिली. गोंधळामुळे पावणेदोन तास वाया गेले. महत्त्वाच्या ९ विधेयकांवर सभागृहात चर्चा होऊन ती मंजूर करण्यात आले. २० महत्त्वाच्या विषयांवर सभागृहात चर्चा झाली त्यात १२० सदस्यांनी विचार मांडल्याचे त्यांनी सांगितले. ८२ तारांकित व १२० अतारांकित प्रश्नांना सरकारच्या वतीने उत्तरे देण्यात आली. शून्य प्रहरात जनहिताच्या वेगवेगळ्या १०६ मुद्यांवर तर विशेषोल्लेखाचे २०५ मुद्दे मांडण्यात आले. ३६ संसदीय समित्यांचे (राज्यसभा) अहवाल सदनाच्या पटलावर मांडण्यात आले.