संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द तर अर्थसंकल्पीय अधिवेशन वेळेआधीच

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 December 2020

काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी वादग्रस्त कृषी कायद्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलवण्याची मागणी केली होती.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचे संकट आणि कृषी कायद्यांवरुन सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या दरम्यानच संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होण्याची शक्यता होती. मात्र आता करोनाचा प्रसार टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी अधिवेशन रद्द करण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे. काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी वादग्रस्त कृषी कायद्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलवण्याची मागणी केली होती. केंद्रीय संसदीय मंत्री प्रल्हाद जोशीद्वारे लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांना लिहलेल्या पत्रानुसार, सरकार जानेवारीपासूनच बजेट सत्राचे आयोजन करु शकते.

कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आलं आहे. हिवाळी अधिवेशन याप्रकारे रद्द होण्याची घटना ही खूप कालावधीनंतर घडत आहे. याबाबतच गेल्या काही दिवसांपूर्वी लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांनी संसदीय मंत्र्यांना पत्र लिहलं होतं. सध्या दिल्लीच्या सीमेवर या कृषी कायद्यांवरुन जोरदार आंदोलन सुरु आहे. या कृषी कायद्यांमध्ये काही दुरुस्त्या करण्याची आवश्यकता आहे असे अधीररंजन चौधरी यांनी म्हटले होते.

हेही वाचा - दिल्लीत शेतकरी आंदोलन अन् मोदी गुजरातमधल्या शेतकऱ्यांना भेटणार

संसदीय मंत्री जोशी यांनी काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांना लिहलेल्या पत्रात म्हटलंय की, करोनामुळेच पावसाळी अधिवेशन सुद्धा उशिराने सप्टेंबर महिन्यात झाले होते. कोरोना संकटामुळे यावेळी पावसाळी अधिवेशनात खूप खबरदारी घेतली गेली होती. या मानसून सत्रात एकूण 27 विधेयकांना पारित केलं गेलं होतं. बजेटचे सत्र जानेवारीच्या अखेरीस सुरु होतं. जोशी यांनी म्हटलंय की, कडक हिवाळा तसेच कोरोनाचे सावट यामुळे दिल्लीत सातत्याने कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. सध्या डिसेंबर महिना अर्धा संपला आहे आणि लवकरच कोरोनाची लस येईल अशी शक्यता आहे. अशा पार्श्वभूमीवर मी अनेक फ्लोअर लीडर्सशी बातचित केली आहे. तसेच त्यांच्यासोबत हिवाळी अधिवेशनाबाबत चर्चा केलीय. यावर अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलंय की, विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कोरोना संकटासोबतच हिवाळी अधिवेशन आयोजित करण्याबाबत आपली काळजी व्यक्त केली होती. जानेवारीतील बजेट सत्र 2021 साठी उपयुक्त आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Winter Session is repealed due to corona Budget Session 2021 will be held in January