'लवकर बरे व्हा'; ममता बॅनर्जींची नड्डांसाठी प्रार्थना

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 13 December 2020

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना कोरोनाची लागण झाली आहे

कोलकाता- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट केलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना कोरोना झाल्याची बातमी कळाली. ते लवकर बरे व्हावेत आणि त्यांचे आरोग्य चांगले व्हावे, अशी प्रार्थना करते, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. 

जे.पी.नड्डा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करुन याची माहिती दिली. मी कोरोन टेस्ट केली, ज्यात माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठीक आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी होम आयसोलेशनमध्ये आहे, सर्व नियमांचे मी पालन करत आहे. मी विनंती करतो की, जे लोक गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आले त्यांनी स्वत:ला आयसोलेट करुन घ्यावं आणि स्वत:ची टेस्ट करुन घ्यावी, असं ते ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

मोठी ब्रेकिंग ! प्रजासत्ताक दिनी मिळणार कोरोनावरील लस

जे.पी. नड्डा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर गेले होते. त्यांनी तेथे प्रचारसभा घेतल्या होत्या. यादरम्यान त्यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. ममता बॅनर्जी आणि भाजप नेत्यांमध्ये चांगलेच वाकयुद्ध सुरु झाले होते. एका प्रचारसभेत बोलताना ममता बॅनर्जींनी नड्डा यांचा उल्लेख ''चड्डा, नड्डा, फड्डा'' असा केला होता. पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेस आणि भाजपने राज्यात वातावरण निर्मिती सुरु केली आहे. 

दरम्यान, भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा, अर्जून राम मेघवाल आणि कैलाश चौधरी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. या नेत्यांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. भाजपचे चेतन चौहान, राज्य सरकार मंत्री कमल रानी वरुण आणि राजस्थानच्या भाजप खासदार किरण माहेश्वरी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wishing him a speedy recovery tweets West Bengal CM Mamata Banerjee for jp nadda