शाळा बंद आणि शिक्षण ऑनलाइन झाल्यानं मुलांमध्ये ऑनलाइन खेळांचे व्यसन वाढत आहे.

शाळा बंद आणि शिक्षण ऑनलाइन झाल्यानं मुलांच्या हाती जास्त वेळ मोबाइल, टॅब आणि लॅपटॉप आले आहेत. यातून मुलांमध्ये ऑनलाइन खेळांचे वाढत व्यसन वाढत आहे.
online game
online gamesakal

नवी दिल्ली - शाळा बंद आणि शिक्षण ऑनलाइन झाल्यानं मुलांच्या हाती जास्त वेळ मोबाइल, टॅब आणि लॅपटॉप आले आहेत. यातून मुलांमध्ये ऑनलाइन खेळांचे वाढत व्यसन वाढत आहे. मग खेळांचे अॅप खरेदी करण्यासाठी पालकांच्या मोबाइलचा वापर केला जातो. यामुळे अनुचित प्रकार घडतात. हे लक्षात घेऊन शिक्षण मंत्रालयाने पालक तसेच शिक्षकांसाठी काही महत्वाची मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यांचा उपयोग मुलांमध्ये निर्माण होणारा मानसिक आणि शारीरिक तणाव कमी करण्यासाठी होणार आहे. तसेच ऑनलाइन गेमिंगच्या इतर परिणामांवर मात करण्यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी नेमके काय करावे, हे समजणे सोपे होणार आहे.

हे करू नये

1.        पालकांच्या परवानगीशिवाय गेममध्ये सांगण्यात आलेली खरेदी करण्यास अनुमती देवू नये. अॅप खरेदी टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार ‘ओटीपी’आधारित पेमेंट पद्धतीचा अवलंब करण्यात यावा.

2.        सबस्क्रिप्शनसाठी अॅप्सवर क्रेडिट/ डेबिट कार्डाची नोंदणी करणे टाळावे. तसेच प्रत्येक व्यवहारासाठी निश्चित खर्चाची कमाल मर्यादा ठेवावी.

3.        गेम खेळण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या लॅपटॉप अथवा मोबाइलवरून मुलांना थेट खरेदी करण्याची परवानगी देवू नये.

4.        अज्ञात वेबसाइटवरून सॉफ्टवेअर आणि गेम्स डाउनलोड करू देवू नये.

5.        वेबसाइटसवर येणा-या लिंक्स, इमेज आणि पॉप-अप्सवर क्लिक करण्यापासून सावध राहण्यास सांगणे. कारण यामधून व्हायरसचा शिरकाव होवून संगणकाला हानी पोहोचू शकते. तसेच अशा लिंक्समध्ये मुलांच्या वयाला अयोग्य असणारी सामुग्री दिलेली असू शकते.

6.        कोणताही गेम डाउनलोड करताना इंटरनेटवर कोणतीही वैयक्तिक माहिती देवू नये, असा सल्ला द्यावा.

7.        मुलांनी गेममध्ये आणि गेमिंग प्रोफाइलवर असलेल्या लोकांबरोबर कोणतीही वैयक्तिक माहिती कधीही सामायिक करू नये.

8.        मुलांना वेब कॅमे-यासमोर कोणत्याही प्रकारे खाजगी संदेश किंवा ऑनलाइन चॅटव्दारे कुणाही अनोळखी व्यक्तींना आणि अगदी प्रौढांनाही माहिती देवू नये. यामुळे ऑनलाइन गैरवर्तन करणा-यांकडून संपर्क साधून किंवा इतर खेळाडूंच्या माध्यमातून धमकावण्याचा, बळजबरी करण्याचा धोका असतो.

9.        गेमिंगमुळे आरोग्याला हानी पोहोचत असल्याचे समजावून सांगावे तसेच विश्रांती न घेता दीर्घकाळ सतत गेममध्ये गुंतून राहू नये, असे सल्ला द्यावा.

हे करावे

1. ऑनलाइन गेम खेळताना जर काही गडबड झाल्याचे लक्षात आले, चूक झाल्याचे लक्षात आले तर लगेच खेळ थांबवा. आणि स्क्रिनशॉट घेवून ठेवा. (कीबोर्डवर ‘प्रिंट स्क्रीन’चे बटण यासाठी वापरावे) आणि या गडबडीविषयी तक्रार करावी.

2. तुमच्या मुलाविषयी गोपनीयता ठेवली जावी, त्याचे संरक्षण करण्यासाठी त्यांना मदत करा. त्यांना यासाठी स्क्रीननाव वापरण्यास सांगावे. मुलाचे खरे नाव उघड केले जावू नये.

3. अँटीव्हायरस /स्पायवेअर प्रोग्रॅम वापरण्यात यावा आणि फायरवॉल वापरून वेब ब्राउझरचे सुरक्षित कॉन्फिगरेशन करणे.

4. डिव्हाइसवर अथवा अॅप किंवा ब्राउझरमध्ये पालकांचे नियंत्रण आणि सुरक्षा वैशिष्ट्ये सक्रिय करण्यात यावीत. त्यामुळे काही विशिष्ट सामुग्रीचा प्रवेश प्रतिबंधित करणे शक्य होते आणि गेममधील खरेदीवर खर्चही मर्यादित करण्यासाठी मदत होते.

5. एखाद्या अनोळखी व्यक्तीने अयोग्य गोष्टींविषयी संभाषण सुरू करण्याचा प्रयत्न केला अथवा त्या व्यक्तीने वैयक्तिक माहितीची विचारणा केली तर त्याची नोंद घेवून तशी सूचना करा.

6. तुमचा मुलगा/मुलगी खेळत असलेल्या कोणत्याही गेमचे वयाचे रेटिंग तपासून घ्या.

7. जर कोणी जबरदस्ती करीत असेल, धाकदपटशा दाखवत असेल तर त्याला प्रतिसाद द्यायचा नाही, हे मुलांना वारंवार सांगा. तसेच जर त्रासदायक संदेश येत असतील तर त्यांची नोंद ठेवून त्या व्यक्तीच्या अशिष्ट वर्तनाची तक्रार संबंधित गेम साइटच्या प्रशासकाकडे करा. त्या व्यक्तीला ब्लॉक करून टाका. त्या व्यक्तीला त्यांच्या खेळाडूंच्या सूचीतून म्यूट करा किंवा ‘अनफ्रेंड’ करा. अथवा गेममधील चॅट कार्य बंद करा.

8. मुले गेममध्ये कसे खेळतात, त्यांची वैयक्तिक माहितीसंबंधी काळजी घेतात का, तसेच मुले कोणाशी संवाद साधतात, हे अधिक चांगले जाणून घेण्यासाठी तुम्हीच मुलांच्या बरोबर ती खेळताना थांबा.

9. ऑनलाइन गेममध्ये केवळ तुमचा पैसा खर्च व्हावा, म्हणजेच तुम्हाला खर्च करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने काही वैशिष्ट्यांचा वापर केलेला असतो. तो एकप्रकारचा जुगारच असतो. त्यामुळे आपण भुलून जायचे नाही, हे आपल्या मुलांना व्यवस्थित समजावून सांगा. ऑनलाइन- आभासी जग आणि प्रत्यक्ष जग यांच्यामध्ये फरक असून त्याच्या परिणामाविषयी मुलांबरोबर बोला.

10. आपली मुले परिवारासाठी असलेल्या संगणकावरून इंटरनेटचा वापर करीत असल्याची नेहमी खात्री करून घ्या.

याबाबतीत सतत जागरूक रहा, डोळे उघडे ठेवा.

1. मुले असामान्य, गुप्तपणे काही वर्तन करीत असतील, तर लक्ष ठेवा.

2. मुले ऑनलाइन खूप वेळ बसायला लागले, विशेषतः समाज माध्यमासाठी ते जास्त वेळ अचानक घालवित असतील तर सावध व्हा.

3. त्यांना बोलावल्यानंतर त्यांच्या डिव्हाइसवरील स्क्रिन बदलत असतील तर लक्ष द्या.

4. इंटरनेट वापरल्यानंतर किंवा मजकूर, संदेश पाठवल्यानंतर ते माघार घेतात ंिकंवा रागावतात का हे पहा.

5. त्यांच्या डिव्हाइसमध्ये अचानक बरेच नवीन फोन नंबर आणि ईमेल संपर्क आले आहेत का पहावे.

6. घरामध्ये इंटरनेट गेटवे स्थापित करावा. त्यामध्ये मुले प्रवेश करू शकतात, अशा सामुग्रीचे निरीक्षण, लॉगिंग आणि नियंत्रण यासारखी वैशिष्ट्ये असावीत.

7. विद्यार्थ्यांला मिळणा-या गुणांमध्ये घसरण झाली असेल आणि त्याचे सामाजिक वर्तन यावर शिक्षकांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

8. विद्यार्थ्याचे वर्तन संशयास्पद अथवा चिंताजनक आहे असे शिक्षकांना वाटले, किंवा एखादी गोष्ट नजरेस आली तर त्याविषयी शाळेच्या अधिका-यांना कळवावे.

9. इंटरनेटचे फायदे आणि तोटे यांच्याविषयी शिक्षकांनी वारंवार मुलांना सांगावे. हे माध्यम किती संवेदनशील आहे, याविषयी मुलांबरोबर चर्चा जरूर करावी.

10. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वेब ब्राउझर आणि वेब अप्लिकेशन यांच्या सुरक्षित कॉन्फिगरेशनचे प्रशिक्षण द्यावे.

कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला तर त्याची तक्रार करण्यासाठी नॅशनल क्राइम रिपोर्टिंग पोर्टलशी संपर्क साधा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com