सोबत राहण्यास नकार दिल्याने प्रियकरावर अ‌ॅसिड हल्ला, महिलेला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kerala acid attacke

सोबत राहण्यास नकार दिल्याने प्रियकरावर अ‌ॅसिड हल्ला, महिलेला अटक

तिरुवनंतरपुरम : प्रियकराने सोबत राहण्यास नकार दिल्यामुळे एका महिलेने त्याच्या चेहऱ्यावर अ‌ॅसिड फेकल्याची घटना समोर आली आहे. केरळमधील इडुक्की (Idukki kerala) जिल्ह्यात ही घटना घडली असून पीडित तरुणाच्या एका डोळ्याची दृष्टी गेली आहे. पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली आहे.

हेही वाचा: ...अन् शवागाराच्या फ्रिजरमध्ये ठेवलेला मृत माणूस ७ तासानंतर झाला जीवंत

अरुणकुमार (२७), असे या तरुणाचे नाव असून तो पुज्जापुरममधील रहिवासी आहे. त्याची शिबा संतोष या ३५ वर्षीय महिलेसोबत सोशल मीडियावरून ओळख झाली होती. त्यानंतर त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले. शिबा ही विवाहित असून दोन मुलांची आई आहे. मात्र, याबाबत अरुणकुमारला माहिती नव्हती. ती प्रियकरासाठी अदीमल्ली सोडून तिरुवनंतरपुरमला राहायला आली. पण, ती दोन मुलांची आई असल्याचे समजल्यानंतर अरुणकुमारने नातं पुढे वाढविण्यासाठी नकार दिला. त्यानंतर परत ती अदीमलीला राहायला गेली. हे प्रकरण कायमच संपविण्याच्या बहाण्याने तिने त्याला अदीमलीला बोलावले. त्यानंतर अरुणकुमार आपल्या काही मित्रांना घेऊन अदीमलीला पोहोचला. तिने सोबत राहण्यासाठी त्याच्याकडे हट्ट धरला. मात्र, त्याने नकार दिला. त्यानंतर तिने त्याच्या चेहऱ्यावर अ‌ॅसिड फेकले. त्याच्या मित्रांनी लगेच त्याला रुग्णालयात हलविले. त्यानंतर डॉक्टरांनी रुग्णाला तिरुवनंतरपुरला हलविण्याचा सल्ला दिला. यामध्ये अरुणकुमारच्या एका डोळ्याची दृष्टी गेली असून शिबाला देखील किरकोळ जखम झाली आहे.

या घटनेनंतर महिला फरार झाली होती. पोलिसांनी तिचा शोध घेतला असता तिच्या पतीच्या घरून तिला अटक करण्यात आली. तसेच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज देखील जप्त करण्यात आले असून त्यामध्ये महिला त्याच्यावर अ‌ॅसिड हल्ला करताना दिसत आहे, असं पोलिसांनी सांगितले.

loading image
go to top