esakal | कोणालाही पाझर फुटेना;आईला JCB मधून रुग्णालयात नेण्याची आली वेळ

बोलून बातमी शोधा

women in jcb
कोणालाही पाझर फुटेना;आईला JCB मधून रुग्णालयात नेण्याची आली वेळ
sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहेत. मात्र, एकीकडे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी, कोविड सेंटर, रुग्णालये यांमध्ये ऑक्सिजन सिलेंडर, बेड, रुग्णवाहिका यांची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासत आहे. आतापर्यंत रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्यामुळे अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. असाच एक प्रकार कर्नाटकमध्ये घडला आहे. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच एका महिलेने (woman)रस्त्यावर प्राण सोडले आहे. यामध्येच आपल्या आईच्या मृतदेहाजवळ बसून तिची मुलगी टाहो फोडत होती. मात्र, कोरोनाच्या(corona) भीतीमुळे कोणत्याही व्यक्तीने तिला मदत केली नाही.

हेही वाचा: Corona Effect: काठीच्या सहाय्याने घातल्या एकमेकांना वरमाला

कर्नाटकातील (karnataka) कोलार शहरातील चंद्रकला (४२) त्यांच्या १२ वर्षीय मुलीसोबत कुरुथहल्ली या गावी जात होत्या. मात्र, अचानक चक्कर येऊन त्या रस्त्यात कोसळल्या. विशेष म्हणजे त्या रस्त्यात पडल्यामुळ त्यांची मुलगी रस्त्यावरुन येणाऱ्या प्रत्येकाकडे मदतीसाठी विनवणी करत होती. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे एकाही व्यक्तीने तिची मदत करण्यास तयार दर्शवली नाही. त्यामुळे १२ वर्षांची ही मुलगी आपल्या आईजवळ रडत बसली होती.

चंद्रकला यांना कोरोना झाला असेल त्यामुळे आपल्या गाडीत घेतलं तर आपल्यालाही कोरोना होईल या भीतीने त्यांना कोणी मदत केली नाही. अखेर गावकऱ्यांनी एका जेसीबीच्या (JCB) मदतीने चंद्रकला यांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र, रुग्णालयात गेल्यावर चंद्रकला यांना मृत घोषित करण्यात आलं.

नेमकं काय घडलं?

चंद्कला या कुरुथहल्ली या गावी मजूर करायच्या. परंतु, बरं वाटत नसल्यामुळे त्या मुलीसोबत घरी निघाल्या होत्या. मात्र, घरी जायला उशीर झाल्यामुळे त्या दोघीही एका दुकानाच्या बाहेर बसल्या. सकाळ झाल्यावर काही गावकऱ्यांनी या दोघींना खाण्यासाठी काही पदार्थ दिले होते. यावेळीही चंद्रकला यांना बरं वाटत नसल्यामुळे त्या मुलीच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपी जाण्याचा प्रयत्न करत होत्या. दुपारी चंद्रकला यांच्या मुलीने त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या बेशुद्धावस्थेत पडल्या होत्या. आपली आई उठत नाही, तिला काय होतंय हे समजत नसल्यामुळे त्यांची मुलगी रडू लागली. लोकांकडे मदत मागू लागली. मात्र, कोणीही तिच्या मदतीसाठी पुढे आलं नाही. त्यानंतर गावकऱ्यांनी जेसीबी मागवून त्यांना रुग्णालयात नेलं. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे त्यांना कोविडदेखील झाला नव्हता. परंतु, नागरिकांनी शहानिशा न करता कोरोनाच्या भीतीमुळे त्यांना मदत करण्याचं टाळलं. चंद्रकला यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वीच निधन झालं असून त्यांच्या पश्चात्य १२ वर्षांची मुलगी आणि १० वर्षांचा एक मुलगा आहे.