
अपहरणाच्या भीतीनं चालत्या ऑटोरिक्षातून महिलेची उडी
हरियाणा : गुरुग्राममधील एका २८ वर्षीय महिलेनं अपहरणाच्या भीतीनं चालत्या ऑटोरिक्षातून उडी मारली. बाजारातून घरी परतत असताना गुरुग्राममधील (Gurugram Haryana) सेक्टर २२ मध्ये ही घटना घडली असून यामध्ये ती किरकोळ जखमी झाली आहे. महिलेने स्वतः ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे.
निष्टा असे महिलेचे नाव असून ती दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घरापासून सात किलोमीटर असलेल्या बाजारातून घरी जायला निघाली. तिच्याकडे पैसे नसल्याने ऑनलाइन पेमेंट करेन, असं सांगून तिने ऑटो घेतला. ती ऑटोत बसली त्यावेळी चालक गाणी ऐकत होता. एका टी पॉईंटवर पोहोचल्यानंतर तिच्या घरी जाण्यासाठी उजवीकडे वळण घ्यायचे होते. मात्र, चालकाने डावीकडे वळण घेतले. तुम्ही डावीकडे वळण का घेतले? असा प्रश्न चालकाला विचारला. त्यावेळी त्याने काहीही उत्तर न देता देवाचे नाव घेण्यास सुरुवात केली. महिलेने त्याच्या खांद्यावर आठ ते दहा वेळा मारले. तरीही त्याने ऑटोरिक्षा थांबवली नाही. शेवटी स्वतःला वाचविण्यासाठी एकच पर्याय उरला होता. त्यामुळे मी ऑटोरिक्षातून उडी घेतली, असं महिलेने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून सांगितलं आहे.
ऑटोरिक्षातून उडी घेतल्यानंतर महिलेला किरकोळ जखमी झाली होती. मात्र, तिने स्वतःला सावरले आणि घराकडे जायला लागली. पण, ऑटोचालक पाठलाग करत असल्याची भीती तिच्या मनात होती. शेवटी तिने एक ई-रीक्षा घेतली आणि घरी पोहोचली. मात्र, भीतीनं ऑटोरिक्षाचा नंबर लिहायला विसरली, असं तिनं सांगितलं. त्यानंतर पालम विहार पोलिस ठाण्याचे एसएचओ जितेंद्र यादव यांनी स्वतः दखल घेतली. तसेच त्या व्यक्तीचा शोध घेण्याचे आश्वासन दिले.