
एवढी कसली भीती? आईने मुलासह स्वतःला ३ वर्ष घेतलं कोंडून; कारण ऐकून बसेल धक्का
एका महिलेने स्वत:ला आणि तिच्या 10 वर्षाच्या मुलाला गुरूग्राम येथील मारुती कुंज येथील घरात तीन वर्षांपासून कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या महिलेला अखेर मंगळवारी पोलिस, आरोग्य अधिकारी आणि सदस्यांच्या पथकाने या घरातून बाहेर काढले. यासाठी बालकल्याण विभागाला घराचा मुख्य दरवाजा तोडावा लागला आहे. मात्र घरात कोंडून घेण्याचे कारण ऐकून धक्का बसेल...
हरियाणातील गुरुग्राममध्ये ही घटना समोर आली आहे. या महिलेने कोरोनाच्या भीतीने तिच्या 10 वर्षाच्या मुलासह तीन वर्षांपासून स्वत:ला भाड्याच्या घरात कोंडून घेतलं होतं.
सुजन माझी असे या महिलेच्या पतीचे नाव असून तो व्यवसायाने इंजिनिअर आहे. 2020 मध्ये जेव्हा सरकारने पहिल्या लॉकडाऊननंतर निर्बंध शिथिल केले तेव्हा महिलेचा पती कामावर गेला होता. तो घरी परतल्यानंतर महिलेने त्याला घरात येऊ दिले नाही. त्यानंतर सुजानने त्याच परिसरात भाड्याने घर घेतले.
सुजन यांच्या त्यांची पत्नी आणि मुलाच्या संपर्कात राहण्याचा एकमेव मार्ग व्हिडिओ कॉल होता. पण त्यांना कोणीही त्रास देऊ नये याचीही त्याने काळजी घेतली. ते मासिक भाडे, वीज बिल भरायचे, मुलाच्या शाळेची फी जमा करायचे, किराणा आणि भाजीपाला खरेदी करायचे आणि रेशनच्या पिशव्या मुख्य दरवाजाबाहेर ठेवत असे.
मिळालेल्या माहितीनुसार, पती त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरवत राहिला, मात्र महिलेने त्याला घरात येऊ दिले नाही. मुनमुन माझी असे या महिलेचे नाव आहे. पतीच्या तक्रारीवरून मंगळवारी आरोग्य व बालकल्याण विकास अधिकाऱ्यांच्या पथकाने महिला आणि तिच्या 10 वर्षाच्या मुलाला घराबाहेर काढले.
तक्रार मिळाल्यानंतर पोलीस आणि आरोग्य विभागाच्या पथकाने दोघांचीही घरातून सुटका केली. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू आहेत. महिलेच्या पतीने सांगितले की, त्याने अनेक वेळा पत्नीला समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु पत्नीला हे समजत नव्हते. पतीने सांगितले की, तिचे मानसिक संतुलन इतके बिघडले होते की तिने माझा घरात प्रवेशही बंद केला.
सिव्हिल सर्जन गुरुग्राम, डॉ. वीरेंद्र यादव यांनी सांगितले की या स्त्रीला काही मानसिक समस्या आहेत. दोघांनाही पीजीआय, रोहतक येथे पाठवण्यात आले असून त्यांना उपचारासाठी मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याच प्रकरणी एएसआय प्रवीण कुमार यांनी सांगितले की, सुरुवातीला आम्ही सुजानच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. मात्र जेव्हा तिने मुलाला माझ्याशी व्हिडिओ कॉलवर बोलण्यास सांगितले तेव्हा मी या प्रकरणात हस्तक्षेप केला.
मुलाने सुर्य देखील पाहिला नाही
पोलिसांनी सांगितले की, ती महिला राहत असलेल्या घरात इतकी घाण आणि कचरा साचला होता की आणखी काही दिवस गेले असते तर काही अनुचित प्रकार घडला असता. महिलेच्या मुलाने गेल्या तीन वर्षांपासून सूर्य पाहिला नसल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या भीतीने या तीन वर्षांत मुनमुनने तिच्या बहुतेक नातेवाईकांशी संपर्क तोडला होता. या काळात तिने आपल्या मुलाला स्मार्टफोन वापरू दिला कारण त्याला ऑनलाइन क्लासेस होते. सिलिंडर बदलावे लागेल म्हणून स्वयंपाकाचा गॅस वापरणेही बंद केले होते. त्याऐवजी ती इंडक्शन हीटर वापरत होती.