मोदी सोशल मीडिया सोडणार नाहीत; महिला चालविणार अकाउंट्स

वृत्तसंस्था
Tuesday, 3 March 2020

‘मी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यू ट्यूबवरील सर्व अकाउंट्स बंद करू इच्छितो, लवकरच याबाबत मी भूमिका स्पष्ट करेन,’’ असेही मोदींनी सोमवारी ट्विट केले होते. डिजिटल इंडियाचा पाया रचणाऱ्या आणि सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर असणाऱ्या जागतिक नेत्यांपैकी एक नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहिले जाते.

नवी दिल्ली : ‘येत्या रविवारपासून मी सोशल मीडिया सोडण्याचा विचार करत आहे, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पण, आज (मंगळवार) मोदींनी ट्विट करत सोशल मीडिया सोडणार नसल्याचे संकेत देत महिला दिनी म्हणजे रविवारी समाजाला प्रभावित करणाऱ्या महिलांना सोशल मीडिया अकाउंट चालविण्यास देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

‘मी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यू ट्यूबवरील सर्व अकाउंट्स बंद करू इच्छितो, लवकरच याबाबत मी भूमिका स्पष्ट करेन,’’ असेही मोदींनी सोमवारी ट्विट केले होते. डिजिटल इंडियाचा पाया रचणाऱ्या आणि सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर असणाऱ्या जागतिक नेत्यांपैकी एक नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहिले जाते. महत्त्वाचे म्हणजे २०१४ मध्ये भाजपने सोशल मीडियाच्या आधारावरच निवडणूक जिंकली होती. मात्र, आता याच माध्यमातून बाहेर पडण्याचा विचार करत असल्याचे ट्विट मोदींनी केल्याने खळबळ उडाली होती. त्यांनी याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नसून, येत्या रविवारी ते यावर अंतिम निर्णय घेणार असल्याचे बोलले जात होते. 

अखेर या रविवारी म्हणजे 8 मार्चला जागतिक महिला दिन आहे. या दिवशी मोदींनी आपली सोशल मीडिया अकाउंट्स समाजात प्रभावी कामगिरी करणाऱ्या आणि सर्वांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या महिलांना आपली अकाउंट्स चालविण्यास देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. #SheInspiresUs हा हॅशटॅग वापरून त्यांनी अशा महिलांनी त्यांच्या स्टोरीज शेअऱ कराव्यात असे आवाहनही त्यांनी केले आहे. मोदींनी या ट्विटसोबत काही निकषही दिले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women Who Inspire To Take Over PM Narendra Modi Social Media Accounts For A Day