सरासरीपेक्षा जास्त कोरोनारुग्ण महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 6 October 2020

भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा काही प्रमाणात कमी होत असला तरी काही राज्यात बिकट परिस्थिती निर्माण होत आहे.

नवी दिल्ली: भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा काही प्रमाणात कमी होत असला तरी काही राज्यात बिकट परिस्थिती निर्माण होत आहे. देशात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तरप्रदेश आणि दिल्लीत कोरोना आटोक्यात येताना दिसत नाही. ज्या राज्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे तिथे टेस्टची संख्याही कमी झाल्याचे दिसले आहे. 

देशात आतापर्यंत झालेल्या कोरोना टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा दर 10 टक्क्यांच्या खाली असून तो 8.28 टक्के एवढा आहे. तर काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात हे प्रमाण देशाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. त्यामध्ये महाराष्ट्राची सगळ्यात वाईट स्थिती असून तिथं हा दर 21.50 टक्के एवढे आहे. म्हणजे 100 लोकांनी कोरोना टेस्ट केली असेल तर त्यातील जवळपास 22 लोकांना कोरोना झाल्याचं आढळलं आहे. महाराष्ट्रासोबत आंध्रप्रदेश (12.90), कर्नाटक (12.21) या राज्यातील परिस्थिती चिंताजनक आहे.

नोबेल पुरस्काराचा मान यंदा तीन संशोधकांना संयुक्तरित्या मिळाला

मागील 24 तासांत देशात कोरोनाने 884 रुग्णांचा मृत्यू झाला असून 61 हजार 267 रुग्णांचं निदान झालं आहे. देशात आतापर्यंतची कोरोना बाधितांची संख्या 66 लाख 85 हजार 83 वर गेली आहे. तर सध्या 9 लाख 19 हजार 23 कोरोना रुग्ण उपचार घेत असून 1 लाख 3 हजार 569 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

सध्या देशात प्रतिदिन 10 लाख लोकसंख्येमागे 140 कोरोना चाचण्या होत आहेत. ही चाचण्यांची संख्या जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) सांगितलेल्या प्रतिदिन चाचण्यांपेक्षा 6 पटीने जास्त आहे. विषेश म्हणजे काही राज्यात देशातील सरासरीपेक्षा जास्त कोरोना चाचण्या होत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare) दिली आहे. 

वाचा सविस्तर: हाथरसप्रकरणी उत्तराखंड काँग्रेसचा सत्याग्रह; देशभरात योगी सरकारविरोधात निषेध आणि आंदोलनं

सोमवारी एका दिवसात देशात कोरोनाच्या 10 लाख 89 हजार 403 चाचण्या झाल्या आहेत. तर आतापर्यंत देशात 8 कोटी 10 लाख 71 हजार 797 कोरोना चाचण्या झाल्याची माहिती आयसीएमआरने (Indian Council of Medical Research) दिली आहे .

महाराष्ट्रात मागील 24 तासांत कोरोनाचे 10 हजार 224 नवीन रुग्ण आढळले असून 263 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी दिलासादायक आहे. कारण मागील काही दिवसांत कोरोनाचे राज्यात प्रतिदिन रुग्ण जवळपास 15-20 हजारांदरम्यान वाढत होते. सध्या राज्यात 2 लाख 52 हजार रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. राज्यात आतापर्यंत 38 हजार 347 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू मुंबईत झाला आहे.   

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Worrying corona conditions in Maharashtra Karnataka Andhra Pradesh state