
मंत्रिमंडळ विस्ताराचे येडियुराप्पांचेही संकेत
बंगळूर - मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार किंवा फेरबदल १० मेपूर्वी होऊ शकतो, असे संकेत भाजप नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी दिले. दुबई दौऱ्यावर जाण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची चर्चा झाल्यानंतर निर्णय होईल.‘ मंत्रिमंडळ विस्तार १० मेपूर्वी होऊ शकतो. मुख्यमंत्री बदलाची चर्चा म्हणजे केवळ चर्चाच आहे. बोम्मई यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये येडियुरप्पा यांच्या जागी मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले होते.
दरम्यान, मंत्रिमंडळाची बैठक ११ मेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा फेरबदल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेतृत्वात संभाव्य बदल आणि मंत्रिमंडळाचा फेरबदल किंवा विस्तार करण्याबाबत शहा यांनी मंगळवारी बंगळूरला भेट दिली. उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा यांनीही बोम्मई यांना विकास आणि निवडणुकीच्या तयारीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगून बाकीचे पक्षनेतृत्वावर सोडण्याचा सल्ला दिला. मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदलाबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता इच्छुकांना वाटत आहे.
गुजरातप्रमाणेच फेरबदल?
राज्य मंत्रिमंडळात सध्या पाच पदे रिक्त आहेत, तर मुख्यमंत्र्यांसह २९ मंत्री आहेत. राज्य मंत्रिमंडळात कमाल ३४ जणांना मंत्री होता येते. काही आमदार तर विधानसभा निवडणुकीपूर्वी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी मंत्रिमंडळात लवकरच गुजरातप्रमाणे फेरबदल करण्याचा सल्ला देत आहेत.
Web Title: Yeddyurappa Also Hints At A Cabinet Expansion
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..