होय, कर्नाटकात 'ऑपरेशन कमळ' झालं; येडियुरप्पांकडून कबुली

वृत्तसंस्था
Sunday, 3 November 2019

- ध्वनिफीत व्हायरल

- सिद्धरामय्यांनी केली राजीनाम्याची मागणी

बंगळूर : हुबळी येथे भाजप नेत्यांच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी "ऑपरेशन कमळ'च्या माध्यमातूनच सरकार अस्तित्वात आल्याचे मान्य केले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सूचनेवरूनच असंतुष्ट आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याचे त्यांनी या ध्वनिफीतमध्ये म्हटले आहे. त्यावर विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी येडियुरप्पा व शहा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. 

दुसऱ्या पक्षाच्या आमदारांना अनधिकृतपणे ताब्यात ठेवणे, हा प्रकार घटनाविरोधी आहे. पक्षांतरविरोधी कायदा कलम 10 चे हे स्पष्टपणे उल्लंघन आहे. सत्ता व संपत्तीचे आमिष दाखवून आमदारांना आपल्या बाजूने वळवून घेण्याचा भाजपने प्रयत्न केल्याचे या ध्वनिफीतमधून स्पष्ट झाले आहे. येडियुरप्पा यांच्या भाषणाची ध्वनिफीत या सर्व गोष्टींचे उत्तर असल्याचे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. 

येडियुरप्पा यांच्या व्हायरल झालेल्या ध्वनिफितीवर पत्रकारांकडे प्रतिक्रिया देताना सिद्धरामय्या म्हणाले, "भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सूचनेवरूनच आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये नेण्यात आल्याचे येडियुरप्पांच्या भाषणावरून स्पष्ट झाले आहे. या गोष्टीची नैतिक जबाबदारी स्वीकारून शहा व येडियुरप्पा या दोघांनीही आपल्या पदांचा राजीनामा दिला पाहिजे.'' 

हुबळी येथे निवडणुकीच्या तयारीसंदर्भात झालेल्या भाजपच्या बैठकीत येडियुरप्पा यांनी अपात्र आमदारांवर बोलताना अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे. अपात्र आमदारांमुळेच राज्यात भाजप सरकार सत्तेवर आले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

अपात्र आमदारांच्या सहकार्याने राज्यात भाजप सरकार सत्तेवर आल्याचे येडियुरप्पा यांनी सांगितले आहे. हे आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी म्हटलेले नाही. अपात्र आमदारांनी आपल्या पक्षातील अव्यवस्थेमुळे त्रस्त होऊन राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्यात भाजपला सत्तेवर येण्यासाठी संधी प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

- व्ही. सोमण्णा, भाजपचे मंत्री 

राज्यपालांकडे तक्रार 

सिद्धरामय्या व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडुराव यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने राजभवनात जाऊन राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेतली व "ऑपरेशन कमळ'संदर्भात त्यांच्याकडे तक्रार दाखल केली.

येडियुरप्पा यांचा राजीनामा घ्यावा किंवा राज्यातील भाजप सरकार बरखास्त करावे, अशी मागणी त्यांनी तक्रारीत केली आहे. येडियुरप्पा यांची ध्वनिफीत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yeddyurappa Confesses to Operation Lotus