संसदेत चाकू घेऊन जाणाऱ्या तरूणाला केले जेरबंद

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

सागर इन्सान असे या तरुणाचे नाव असून हरयाणातील बलात्काराच्या आरोपात दोषी ठरलेला बाबा गुरमीत राम रहीम याचा शिष्य असल्याचे तो सांगत होता.

नवी दिल्ली : देशातील सर्वांत कडेकोट बंदोबस्त असलेल्या जागांपैकी एक असलेल्या संसद भवनात आज (सोमवार) एका तरुणाने धारदार चाकू घेऊन घुसखोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. दुपारी पावणेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला.

संसद सुरक्षा यंत्रणा व पोलिसांनी या तरूणाला तत्काळ जेरबंद केले. सागर इन्सान असे या तरुणाचे नाव असून हरयाणातील बलात्काराच्या आरोपात दोषी ठरलेला बाबा गुरमीत राम रहीम याचा शिष्य असल्याचे तो सांगत होता. 

सागर इन्सान हा लक्ष्मीनगर भागातील रहिवासी असल्याचे सांगितले जाते. त्याच्या डोक्‍यावर परिणाम झाला आहे काय? तसेच चाकू घेऊन तो संसदेत का जाऊ इच्छित होता? याची चौकशी दिल्ली पोलिस करत आहेत. 

संसद भवनाच्या सर्व दिशांना बहुपेडी सुरक्षा यंत्रणेने वेढलेले असते. केवळ दिल्लीच नव्हे, तर संपूर्ण देशातील अतिशय कडेकोट सुरक्षा असलेल्या इमारतीत या संसद भवनाचा समावेश होतो. 2001 मध्ये संसदेवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर संसद भवनाच्या सुरक्षा व्यवस्थेत अनेक बदल करण्यात आले होते. राष्ट्रपती भवन व रायसीना हिल्सवरील नॉर्थ व साऊथ ब्लॉकसह पंतप्रधान निवासस्थान, संसद भवन व पंतप्रधान कार्यालय परिसरावरून विमानांच्या उड्डाणास 2001 नंतर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे.

- माथेफिरूचा संसदेत चाकू घेऊन जाण्याचा प्रयत्न

संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी असलेल्या वॉच अँड वॉर्ड यंत्रणेऐवजी 'संसदीय सुरक्षा यंत्रणा' ही नवीन समन्वित यंत्रणा अलीकडेच अंमलात आली. संसदेचा वर्तुळाकार परिसर व आतील भागांतील गल्ल्यांसह तीनही मजल्यांवर जागोजाग सुरक्षा रक्षकांचा खडा पहारा असतो. सर्वसामान्य जनतेला रेल्वे भवनाजवळील मुख्य प्रवेशद्वार वगळता इतर कोणत्याही प्रवेशद्वारातून संसद आवारातही प्रवेश मिळत नाही.

संसदेत प्रवेश करताना मोबाईल, पेन, की-चेन वा कोणतीही धातूची वस्तू नेण्यास सक्त मनाई आहे. अशा स्थितीतही हा चाकूधारी तरूण थेट सुरक्षेच्या एका साखळीतून पार होणे हे गंभीर मानले जाते. सागर हा मोटारसायकलवरून विजय चौकाजवळच्या संसदेच्या आर्यन गेटजवळ (क्रमांक 1) आला व तेथून आत घुसण्याचा प्रयत्न त्याने केला.

सुरक्षा रक्षकांनी त्याला हटकले तरी तो पुढे पुढे जात राहिल्यावर त्याच्या मुसक्‍या आवळण्यात आल्या. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळील एक धारदार चाकू जप्त करण्यात आला. त्याला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A young man enters with a knife in Parliament House was arrested