
अपघातात मृत्यू झालेल्या झोमॅटो बॉयच्या पत्नीला कंपनीकडून नोकरी
दिल्ली : कुटुंबियांची आर्थिक जबाबदारी खांद्यावर असलेल्या तरुणाला पोलिसाच्या हलगर्जीपणामुळे जीव गमावल्याची धक्कादायक घटना दिल्लीतील रोहीणी भागात घडली होती. पोलिस कर्मचारी हा दारुच्या नशेत कार चालवत होता. त्याने झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या सलील त्रिपाठी या तरुणाच्या बाईकला धडक दिली होती. (Zomato Delivery Boy Killed By Road Accident In Delhi Rohini Area )
या अपघातामध्ये सलीलचा मृत्यू झाला होता. आम्ही सलीलच्या कुटुंबाला मदत करू, तसेच सलीलच्या पत्नीला नोकरी देण्याचे आश्वासन झोमॅटोचे संस्थापक दिपिंदर गोयल (Zomato Founder Deepinder Goyal) यांनी गुरुवारी ट्वीटद्वारे दिले आहे.
सलील हा हॉटेल मॅनेजनेंटचा पदवीधर असून त्याने कोरोना काळात त्याची नोकरी गमावल्यानंतर झोमॅटोमध्ये काम सुरु केलं होतं. मागच्या आठवड्यात तो कामावर असताना दिल्ली पोलिस हवालदाराच्या चारचाकी गाडीने त्याला धडक दिली होती आणि या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. तो त्याच्या घरातील एकमेव कमावता व्यक्ती होता. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबाचा आधार हरवला होता.
गुरुवारी, गोयल यांनी एक ट्विट द्वारे असे सांगितले की, झोमॅटोच्या कर्मचार्यांनी कुटुंबासाठी एकत्रितपणे 12 लाख आणि विमा संरक्षणानुसार अतिरिक्त 10 लाख रुपयांची मदत दिली जाईल. पुढे ते म्हणाले की, सलीलच्या पत्नीला नोकरी देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जेणेकरुन ती त्यांच्या १० वर्षाच्या मुलाचा खर्च करु शकेल. तसेच झोमॅटोच्या अधिका-यांनी सांगितले की ते घटनेपासून कुटुंबाच्या संपर्कात आहेत आणि शक्य ती सर्व मदत दिली जाईल.
“आमच्या डिलिव्हरी पार्टनर सलील त्रिपाठीच्या एका दुर्दैवी रस्त्याच्या घटनेत झालेल्या मृत्यूमुळे आम्ही खूप दुःखी आहोत. यातून कुटुंबाला मदत करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करत आहोत,” असे गोयल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, सलीलच्या कुटुंबासाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. सुचेता आणि तिच्या मुलाला मदत करण्यासाठी अनेक लोकांनी संपर्क साधून पैसे दान केले आहेत. लोकांनी दान केलेल्या पैशांतून ८ लाख रुपये जमा झाल्याचे सलीलच्या चुलतभावाने सांगितले. तसेच तो पुढे म्हणाला की, लोकांनी केलेल्या मदतीमुळे आम्ही त्यांचे आभार मानतो. आम्ही भावासाठी न्याय मागत आहोत. ज्या पोलिसाच्या गाडीने सलीलला धडक दिली होती त्या पोलिसांवर योग्य कारवाई व्हावी, आणि सुचेताला तीच्या मुलाची आणि सासूची काळजी घेण्यासाठी नोकरीचीसुद्धा गरज आहे अशी अपेक्षा सलीलच्या चुलतभावाने व्यक्त केली आहे.
दिल्ली पोलिसांनी काँस्टेबल झिले सिंगवर बेदरकारपणे गाडी चालवल्याचा आणि निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अपघाताच्या वेळी सिंग मद्यधुंद अवस्थेत होता असा स्थानिकांनी आरोप केल्यानंतर त्यांनी अल्कोहोलची चाचणी घेण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवला असून अहवाल अजून आला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Web Title: Zomato Delivery Boy Saleel Tripathi Killed Road Accident Zomato Help
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..