बागायतीने फुलविले प्रगतीचे मळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बागायतीने फुलविले प्रगतीचे मळे
बागायतीने फुलविले प्रगतीचे मळे

बागायतीने फुलविले प्रगतीचे मळे

पालघर जिल्ह्यातील वाणगाव स्थानकापासून चार किलोमीटर अंतरावर आसनगाव आहे. तिथे खासगी वाहनाने जाता येते. संपूर्ण गाव बागायती शेतीने बहरला आहे. पूर्वापार पद्धतीने शेती करणारा येथील शेतकरी सुधारित शेती औजारांचा वापर, जमिनीच्या प्रतवारीप्रमाणे पिकांची लागवड अशा अत्याधुनिक तंत्राचा वापर करत आहे. त्यामुळे परदेशात देखील येथील उत्पादनाने भुरळ घालत आहेत. ढोबळी मिरचीचे विक्रमी उत्पादन आणि अनेकविध प्रकारची पिके येथे घेतली जातात. केवळ शेतीतून गावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. पालघर जिल्ह्याच्या विकासाला या गावाच्या शेतीतील प्रयत्नांमुळे हातभार लागत आहे.

सुमारे शंभर वर्षांचा आसनगावच्या बागायत शेतीचा इतिहास आहे. पूर्वी रहाटाने पाणी देत शेती केली जायची. अनेक वर्षे याच पद्धतीने बागायत फुलवली गेली, त्यानंतर परिवर्तन झाले. इस्रायली तंत्रज्ञान आणि तांत्रिक शेतीचा अवलंब केला गेला आणि ढोबळी मिरची, चिकू, नारळ, दुधी, वांगी, भाजीपाला, सुपारी, केळी, लिली, गुलाबाच्या बागा तयार केल्या गेल्या. खऱ्या अर्थाने हा भाग समृद्ध झाला. दरम्यान या परिसरात सूर्या धरण झाले, पण त्याचे पाणी काही गावाला मिळाले नाही. शेतकरी कूपनलिका, बंधारे बांधून पाणी वापरत आहेत. महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रातील हा विकसित कोपरा आहे. गावातील प्रगतशील शेतकरी मिलिंद पाटील यांना कृषी मित्र पुरस्काराने सन्मानित केले आहे. किनारपट्टी आणि धरणाचा भाग असूनदेखील त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. या भागात ‘सूर्या’चे पाणी पोहचले तर हा भाग अधिक समृद्ध, सुजलाम सुफलाम होईल आणि या व्यवसायाशी निगडित नागरिक जोमाने विकासाच्या दिशेने वाटचाल करतील.

गावातील बागायतदार शेतीमुळे बांबू, तार, दोरी, वाहतूक, स्थानिक बाजारपेठा, अन्नप्रक्रिया उद्योग यांच्यासह अनेक व्यवसायांना हातभार लागत आहे. गवताचे उत्पादन होत असल्याने गावात शेती पूरक दुग्धव्यवसाय, पशुपालनालादेखील चालना मिळत आहे. त्यामुळे येथील शेतकरी, शेतमजूर यांना गावातच रोजगार मिळत असल्याने, गावातून रोजगारासाठी स्थलांतराचे प्रमाण अत्यल्प आहे. काही उच्च शिक्षीत गावातच व्यवसाय सुरू करतात, तर अपवादानेच एखाददुसरा बाहेरगावी जात आहे.

येथील ढोबळी मिरची अमृतसर, दिल्ली, लुधियाना, जम्मू, हैदराबाद, लखनौ आणि पश्‍चिम बंगाल, तसेच फ्रान्ससह युरोप खंडात आणि थायलंड या देशातही विकली जाते. येथील तिखट मिरचीसह गुलाबही तेथे पोहचले आहेत. एकरी ४० टन उत्पादन हे ढोबळी मिरचीचे आहे. एकूण २०० एकर क्षेत्रावर लागवड असून, साधी मिरचीचे प्रमाणदेखील तितकेच आहे. विकास पाटील यांनी पपई उत्पादनाचा विक्रम केला होता, असा या गावाचा लौकीक आहे. याचबरोबर झेंडू फुलाचे उत्पादनदेखील मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या ठिकाणी वि. म. पाटील कृषी प्रतिष्ठानचे कृषी तंत्र निकेतन आहे. फॅशन डिझाइनसह कमवा व शिका यातून शेतकऱ्यांच्या पाल्यांना विनामूल्य शिक्षण दिले जाते. देशातले मुलींसाठी आठवे महाविद्यालय आसनगाव येथे आहे. विकास पाटील, मिलिंद पाटील, दीपक कोरे, विभव पाटील, संजय कोरे, मनीष देसले, संतोष पाटील, कल्पेश राऊत, विद्याधर पाटील हे गावातील प्रयोगशील आणि प्रगतशील शेतकरी आहेत. अनेक राज्यस्तरीय पुरस्कारदेखील या शेतकऱ्यांच्या प्रयोगांना मिळाले आहेत. बेरोजगारांना रोजगार, उद्योगांना चालना मिळत असल्याने येथील कृषिसंपन्न शेतकरी फक्त पालघर जिल्ह्याच्या नव्हे तर देशांच्या विकासाला बळ देत आहेत.

loading image
go to top