esakal | अल्पसंख्याक मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी 12 लाखांचं उद्दिष्ट - राजेश क्षीरसागर
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पसंख्याक मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी 12 लाखांचं उद्दिष्ट - राजेश क्षीरसागर

अल्पसंख्याक मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी 12 लाखांचं उद्दिष्ट - राजेश क्षीरसागर

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाने प्रीमॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेसाठी यंदा १२ लाख अर्जांच्या नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. या योजनेसाठी केंद्र शासनाच्या सूचनांना अनुसरून संचालक तुकाराम सुपे यांनी सर्व शिक्षणाधिकारी व शाळांसाठी परिपत्रक जारी केले आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०२१ असल्याची माहिती प्रौढ व अल्पसंख्यांक शिक्षण विभागाचे राज्य उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी दिली.

हेही वाचा: आता तरी शाळा सुरू करायला परवानगी मिळावी; मुख्याध्यापक संघाची मागणी

धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या १५ कलमी कार्यक्रमानुसार मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी व जैन या धार्मिक अल्पसंख्याक समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या पहिली ते दहावीच्या वर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी १२ वर्षांपूर्वी राज्यातही प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सुरु झाली आहे. यंदा एनएसपी 2.0 पोर्टलवर नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची सुरुवात १८ ऑगस्ट पासून झाली आहे.

नवीन व नुतनीकरण विद्यार्थ्याने शाळेमार्फत अर्ज ऑनलाईन सादर करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०२१ ही आहे. शाळा स्तरावर अर्ज पडताळणीची अंतिम तारीख १५ डिसेंबर असुन जिल्हा स्तरावर अर्ज पडताळणीची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे. पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शासकीय, निमशासकीय, खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शासन मान्यताप्राप्त शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे.

त्यासाठी अर्जदार विद्यार्थी मागील वर्षी ५० टक्के पेक्षा जास्त गुणाने उतीर्ण झालेला असावा, पालकाचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावे, उत्पन्न प्रमाणपत्र हे सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले असावे, एका कुटुंबातील दोन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. अशा या योजनेसाठी अटी आहेत. अर्ज भरताना विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, बँक व आधार माहिती अचूक भरणे आवश्यक आहे.

हेही वाचा: देशात बेरोजगारीत वाढ; एका महिन्यात गेल्या १५.५० लाख नोकऱ्या

धर्माबाबतचे स्वयंघोषणापत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, गुणपत्रक, आधारकार्ड-आधार नोंदणी पावती, विद्यार्थ्याचा फोटो, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत इत्यादी कागदपत्रे शाळेच्या मुख्याध्यापकांना सादर करावीत. ह्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी इतर तत्सम शिष्यवृत्तींचा लाभ घेतलेला नसावा.एकूण पात्र विद्यार्थ्यांपैकी ३० टक्के शिष्यवृत्ती विद्यार्थीनीसाठी राखीव आहेत. विद्यार्थी शिकत असलेल्या शाळांच्या वसतीगृहात राहत असतील अथवा राज्यशासनाच्या वसतीगृहात राहत असतील केवळ तेच विद्यार्थी या योजनेत वसतीगृहाचे विद्यार्थी म्हणून गणले जातात.

तसेच वसतिगृहामध्ये भरलेले शुल्काचा पावत्या शाळेच्या मुख्याध्यापकांना सादर करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांचे बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेचे असावे, नसल्यास पालकांच्या राष्ट्रीयकृत बँक खात्याची माहिती अर्जात भरता येईल. नवीन व नुतनीकरणाचे अर्ज www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची राहील, असेही क्षीरसागर यांनी सांगीतले.

"मागील वर्षी नवीन व नूतनीकरण मिळून साडेअकरा लाख अर्ज प्राप्त झाले होते. चालू वर्षी नवीन पाच लाख व नूतनीकरणाचे सात लाख असे एकूण बारा लाख अर्ज नोंदणीचे यांची उद्दिष्ट ठेवले आहे. ऑनलाईन अर्ज सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकाचे सक्षम अधिकार्‍याचे (तहसीलदार किंवा तत्सम) उत्पन्नाचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे. अर्ज करण्यासाठी पुरेसा कालावधी देण्यात आला आहे." -राजेश क्षीरसागर उपसंचालक, प्रौढ व निरंतर शिक्षण विभाग

loading image
go to top