esakal | आता तरी शाळा सुरू करायला परवानगी मिळावी; मुख्याध्यापक संघाची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

school

आता तरी शाळा सुरू करायला परवानगी मिळावी; मुख्याध्यापक संघाची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सतत घरात राहून येणाऱ्या एकटेपणामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे अनेक पालक शाळा सुरू करण्यात याव्यात, याबाबत सकारात्मक  आहेत. ऑनलाइन शिक्षणात सर्व मुलांना सहभागी होता येत नाही, हे वास्तव आहे. तसेच काही ठिकाणी डोंगरदऱ्यांचा भाग असल्याने तेथे मोबाईल नेटवर्क उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्ह्यात ऑफलाइन शाळा सुरू करण्यास परवानगी द्यावी, या मागणीचे निवेदन पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने निवासी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

हेही वाचा: ...अन्यथा राज्यात पुन्हा निर्बंध, अजित पवारांचा थेट इशारा

पुणे जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू करण्याबाबत पुणे जिल्हा मुख्याध्यपक संघाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने ठराव करण्यात आला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड, सरचिटणीस सुरेश कांचन आदी उपस्थित होते.

शाळोच्या परिसरात शासकीय रुग्णालय व आरोग्य उपकेंद्र यांच्या माध्यमातून शाळा व आरोग्य अधिकारी यांच्यात समन्वय ठेवून विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राण्यासाठी सकारात्मक विचार करून शाळा सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

हेही वाचा: श्रीपतपिंपरीच्या ओढ्यावरील पुलावरुन वाहतेय पाणी

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबविण्यासाठी शाळा सुरू कराव्यात-

‘‘सध्या इयत्ता पहिली आणि दुसरीत असणाऱ्या मुलांनी अद्याप शाळेची पायरी चढलेली नाही. तसेच पुरेसे नेटवर्क उपलब्ध नसल्याने आणि मोबाईलची सुविधा नसल्याने हजारो विद्यार्थी शिक्षणाचा प्रवाहातून बाहेर पडली आहेत. या मुलांना वेळीच शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची गरज असून, त्यासाठी शाळा सुरू करणे हाच पर्याय आहे. आता पालकही मुलांना शाळेत पाठविण्यासाठी संमती द्यायला तयार आहेत. त्यासाठी शासनाने भूमिका घेणे गरजेचे आहे. ऑनलाइन शिक्षण मुलांना कंटाळवाणे वाटू लागले आहे. शिक्षकांनी आणि पालकांनी पुरेशी काळजी घेतली तर कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फारसा धोका राहणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा सुरू करणे गरजेचे आहे.’’

- नंदकुमार सागर, कार्याध्यक्ष, पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्यध्यापक संघ

हेही वाचा: गणेशोत्सवामध्ये पुण्यात नवे निर्बंध नाहीत, पण... - अजित पवार

शाळा सुरू करण्याबाबत मुख्याध्यापक संघाने सुचविलेले पर्याय :

  • शासनाच्या आदेशानुसार तीन तासांची शाळा भरविता येईल

  • शाळा टप्प्या-टप्प्याने व शिफ्टमध्ये सुरू करता येतील

  • थर्मामीटर, ऑक्सिमीटरद्वारे दररोज विद्यार्थ्यांची तपासणी करणे

  • शाळा आणि आरोग्य अधिकारी यांच्यात समन्वय साधणे

loading image
go to top