पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या सेवासुविधांसाठी १७९ कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune University

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०२२-२३ या आर्थिक वर्षातील खर्चासाठी ५५१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अधिसभेत मांडण्यात आला.

पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या सेवासुविधांसाठी १७९ कोटी

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune University) २०२२-२३ या आर्थिक वर्षातील खर्चासाठी (Expenditure) ५५१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प (Budget) बुधवारी (ता.३०) अधिसभेत मांडण्यात आला. यातील १७९ कोटी ४९ लाख रुपये विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष सेवा आणि सुविधांसाठी खर्च करण्यात येणार आहे.

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार आणि अधिसभेच्या उपस्थितीत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांनी हा अर्थसंकल्प मांडला. ते म्हणाले,‘‘विद्यापीठाच्या आवारातील अपूर्ण इमारती पूर्ण करण्यावर अर्थसंकल्पात भर दिला आहे. तसेच नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये राबवायच्या उपक्रमांसाठीही अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.’’ यंदाच्या अर्थसंकल्पात ६९ कोटी ४० लाख रुपयांची वित्तीय तूट आहे.

विद्यापीठात आता व्यापारी लेखांकन पद्धत -

विद्यापीठातील आर्थिक कामकाजासाठी आजवर लेखा पद्धतीचा वापर करण्यात येत होता. एक एप्रिलपासून व्यापारी लेखांकन पद्धत (मर्कंटाईल सिस्टम) लागू करण्यात येणार आहे. यामुळे दैनंदिन आर्थिक व्यवहारात सहजता व सुलभता येईल, असा विश्वास पांडे यांनी व्यक्त केला.

अर्थसंकल्पात नवं काय -

१) प्रयोग उपकरण विकसन केंद्र (तरतूद २५ लाख) - अंतरिक्ष मोहिमांमध्ये भौतिक, रसायन आणि जैविकशास्र प्रयोगांसाठी आवश्यक उपकरणांची निर्मिती करणारे विद्यापीठातील केंद्र

२) मराठा साम्राज्य अभ्यास केंद्र (तरतूद २० लाख) - मराठी साम्राज्याशी निगडित मोडी लिपीतील कागदपत्रांचे डिजीटायझेशन आणि अभ्यास

३) रोहिणी भाटे नृत्य संशोधन केंद्र (१० लाख) - भारतीय शास्रीय नृत्यविषयक मूलभूत संशोधन केंद्र

४) संग्रहालय शास्र विभाग (२५ लाख) - राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या माध्यमातून या विभागाची सुरवात

पालक गमाविलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य -

कोरोनात किंवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत पालक गमाविलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वामी विवेकानंद विद्यार्थी साहाय्य योजनेची घोषणा करण्यात आली. यासाठी ३ कोटी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसाहाय्य आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेसाठी प्रत्येकी एक कोटी, तर छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा ज्योतिराव फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी प्रत्येकी दोन कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या तरतूदी -

- नाशिक आणि नगर उपकेंद्र इमारत - प्रत्येकी दोन कोटी

- विद्यापीठाच्या आवारातील उदवाहकासाठी - एक कोटी

- विद्युतीकरणासाठी - दोन कोटी

- विद्यार्थी विकास मंडळ - ९ कोटी ७५ लाख

- खाशाबा जाधव क्रिडा संकुल - दोन कोटी

- विद्यार्थी वसतिगृह (देखभाल, विकास) - दोन कोटी १८ लाख

- विद्यार्थी सुरक्षा विमा व आपत्कालीन साहाय्य - ४० लाख

Web Title: 179 Crore Budget For Services Of Pune University Students

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..