11th Admission : शिक्षण विभागाचे नियोजनच गडबडले;दहावीच्या निकालानंतर पहिल्या फेरीतील यादीसाठी महिना उलटणार

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या नियमित फेरीची निवड यादी तब्बल एका महिन्याने जाहीर होईल.
11th Admission
11th Admissionsakal

पुणे : दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या नियमित फेरीची निवड यादी तब्बल एका महिन्याने जाहीर होईल. प्रवेश अर्जाचा भाग दोन महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविण्याची सुविधा येत्या बुधवारपासून (ता. ५) सुरू होईल. पहिल्या नियमित फेरीतील निवड यादी २६ जूनला जाहीर होईल.

दरवर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल लवकर जाहीर झाला. त्यानंतर लगेच प्रवेश अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रियाही लवकर सुरू होणे अपेक्षित होते. परंतु निकाल लवकर लागल्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे अकरावी प्रवेशाच्या नियोजनाचे ‘गणित’ यंदा गडबडल्याचे दिसते. गेल्या काही वर्षांपासून निकाल जाहीर होण्यापूर्वीच अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू होते. दरवर्षी निकाल जाहीर झाल्यानंतरच महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होते. यंदा मात्र निकाल २७ मे रोजी जाहीर झाल्यानंतर पाच दिवसांनी प्रवेशाचे नियोजन जाहीर करण्यात आले. निकालानंतर तब्बल नऊ दिवसांनी अर्जाचा भाग दोन भरण्याची सुविधा खुली होईल. त्यामुळे निकाल लवकर जाहीर करूनही प्रवेश प्रक्रिया कासव गतीने पुढे सरकत आहे.

‘कॅप’अंतर्गत अशी असेल प्रक्रिया

पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रांतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (कॅप) राबविण्यात येत आहे. यात महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदवून अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया येत्या बुधवारपासून (ता. ५) सुरू होईल. या अंतर्गत विद्यार्थ्यांना पहिल्या नियमित फेरीसाठी १६ जूनपर्यंत पसंतीक्रम नोंदविता येईल. भाग दोन भरलेल्या आणि पडताळणी झालेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी १८ जूनला जाहीर होईल पहिल्या नियमित फेरीची निवड यादी २६ जून रोजी जाहीर होईल. यात विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कोणते महाविद्यालय मिळाले हे त्यांच्या लॉगिनमध्ये दिसेल. विद्यार्थ्यांना संक्षिप्त एसएमएसही पाठविण्यात येईल. संबंधित महाविद्यालयांना प्रवेशासाठी मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी कॉलेज लॉगिनमध्ये दर्शविली जाईल. याच दिवशी पहिल्या फेरीचा कट-ऑफही जाहीर होईल, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक दिलीप जगदाळे यांनी स्पष्ट केले आहे.

संभाव्य नियोजन

  • दुसरी नियमित प्रवेश फेरी : २ ते ८ जुलै

  • तिसरी नियमित प्रवेश फेरी : ९ ते १८ जुलै

  • विशेष प्रवेश फेरी : १९ ते २६ जुलै

विद्यार्थ्यांसाठी/पालकांसाठी सूचना

  • महाविद्यालयाचा पसंतीक्रम नोंदवून झाल्यानंतर अर्जाचा भाग दोन लॉक असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज ॲलॉटमेंटसाठी विचारात घेतले जातील. त्यामुळे प्रवेशासाठी अर्जाचा भाग दोन लॉक करणे अनिवार्य आहे.

  • प्रवेशासाठी मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी लॉगिनमध्ये ‘प्रोसिड फॉर ॲडमिशन’वर क्लिक करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा.

  • एखाद्या विद्यार्थ्याला प्रवेशासाठी मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल, तर तो पुढील फेऱ्यांमध्ये सहभागी होऊ शकतो.

  • विद्यार्थ्यांनी दिलेल्या पसंतीक्रमातील पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाल्यास त्यांनी तेथेच प्रवेश घेणे अनिवार्य आहे. प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतल्यास किंवा प्रवेश नाकारल्यास, संबंधित विद्यार्थी पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित केला जाईल.

  • एखाद्या विद्यार्थ्याला निश्चित केलेला प्रवेश रद्द करायचा असल्यास, त्यासाठी संबंधित विद्यालयास विनंती करून आपला प्रवेश रद्द करून घेता येईल. घेतलेला प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित होतील.

‘कॅप’अंतर्गत पहिल्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक

तपशील : कालावधी

  • प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे, अर्जाचा भाग दोन भरणे, नवीन विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे, अर्ज प्रमाणित करून घेणे आणि लगेच अर्जाचा भाग दोन भरणे : ५ ते १६ जून

  • अर्जाचा भाग दोन भरलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करणे : १८ जून

  • गुणवत्ता यादीमध्ये विद्यार्थी तपशीलामध्ये दुरुस्ती असल्यास विद्यार्थ्यांनी ऑनलाइन हरकती नोंदविणे, संबंधित शिक्षण उपसंचालकांनी गुणवत्ता यादी दुरुस्तीबाबत हरकतींचे ऑनलाइन निराकरण करणे : १८ ते २१ जून

  • प्रवेश प्रक्रियेची अंतर्गत कार्यवाही, पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करणे, तसेच विभागीय कॅप समित्यांकडून ॲलॉटमेंटचे पूर्व परीक्षण करणे : २२ ते २५ जून

  • विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विद्यालय निवड यादी संकेतस्थळावर प्रदर्शित करणे, विद्यार्थी लॉगिनमध्ये प्रवेशासाठी मिळालेले महाविद्यालय दर्शविणे, संबंधित महाविद्यालयास प्रवेशासाठी मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी कॉलेज लॉगिनमध्ये दर्शविणे, फेरीचा कट-ऑफ जाहीर करणे : २६ जून (सकाळी दहा वाजता)

  • विद्यार्थ्यांनी मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे, मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा नसल्यास पुढील

  • फेरीची प्रतीक्षा करणे, घेतलेला प्रवेश रद्द करणे किंवा नाकारणे, पुढील फेरीसाठी नवीन विद्यार्थी नोंदणी आणि अर्जाचा भाग एक भरणे : २६ ते २९ जून

  • कनिष्ठ महाविद्यालय/उच्च माध्यमिक विद्यालयांनी प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलवर ऑनलाइनद्वारे नोंदविणे : २९ जून

  • (रात्री आठ वाजेपर्यंत)

  • प्रवेशाच्या नियमित दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करणे :

  • १ जुलै

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com