‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’च्या वाटेवर...

अभय जेरे
Thursday, 30 January 2020

डिजिटल पुणे हॅकेथॉनमध्ये २० महाविद्यालयांतील ३६ गटांनी भाग घेतला होता. आता मी भारतातील हजारो संस्थांत हा उपक्रम राबविण्याचा विचार करू लागलो.

भारतातील कुलगुरूंच्या कन्याकुमारी येथील परिषदेत मी इनोव्हेशनवर संवाद साधत होतो. मी म्हणालो, ‘माझ्याच कामाची दोन उदाहरणे देतो. पुण्याचे तत्कालीन महापालिका आयुक्त कुणाल कुमार २०१५मध्ये स्मार्ट सिटीच्या प्रस्तावावर काम करत होते. एकदा चर्चेदरम्यान त्यांनी विचारले, ‘आपण नागरिकांना या प्रस्तावामध्ये सहभागी करून घेण्यासाठी काही इनोव्हेटिव्ह मॉडेल तयार करू शकतो का? असे एखादे मॉडेल जे भारतात अजूनपर्यंत कुणीच केले नसेल.’ मी पुणे हॅकेथॉनमध्ये हे करण्याचे सुचविले. ते किंवा त्यांच्या गटातील सदस्यही हॅकेथॉनच्या संकल्पनेबद्दल अनभिज्ञ होते. मी त्यांना ती कल्पना विशद केली. ‘या स्पर्धेत सलग ३६ किंवा २८ तासांत इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट विकसित केले जाते. आपण पुण्यातील तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांना, पुणे महापालिका, पोलिस, पीएमपीएमएल आणि पीएमआरडीएमधील १५ ते २० समस्यांवर चाकोरीबाहेरचे, इनोव्हेटिव्ह उपाय सुचविण्याचे आवाहन करू,’ असे सांगितले. आयुक्तांना ही संकल्पना आवडली. आम्ही डिजिटल पुणे हॅकेथॉन घेण्याचे ठरविले. आपल्या बहुतेक तंत्रज्ञान संस्थांही या संकल्पनेबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होत्या. त्यामुळे मी पुण्यातील जवळपास प्रत्येक संस्थेत जाऊन प्राध्यापक व विद्यार्थ्यांना ती समजावली. आम्ही त्यासाठी ‘सकाळ’बरोबर भागीदारीही केली. आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मी प्रत्यक्ष हॅकेथॉनदरम्यानही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘आम्ही या अनोख्या कामाचा खरेच आनंद लुटत आहोत,’ असे त्यांनी सांगितले. पुण्याच्या उपयोगी पडणारे उत्पादन विकसित करत असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता. ते पुणे आणि पर्यायाने देशाच्या विकासासाठी काम करत होते. मी ही क्षमता ओळखली आणि आपण भारतभरातील विद्यार्थ्यांना प्रेरित केल्यास चमत्कार घडवू शकतो, असेही लक्षात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राष्ट्रस्तरीय स्पर्धेसाठी प्रयत्न...
त्या वेळी मी हा स्थानिक उपक्रम राष्ट्रीय स्तरावर राबविण्याचे ठरविले. माझ्या सर्व सहकाऱ्यांनी माझी खिल्ली उडविली. डिजिटल पुणे हॅकेथॉनमध्ये २० महाविद्यालयांतील ३६ गटांनी भाग घेतला होता. आता मी भारतातील हजारो संस्थांत हा उपक्रम राबविण्याचा विचार करू लागलो. डॉ. आनंद देशपांडे यांनी मात्र मला पाठिंबा दिला. दिल्लीत या संकल्पनेचे महत्त्व ओळखणाऱ्या योग्य व्यक्तींना भेटण्याचा सल्लाही त्यांनी दिला. आम्ही अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) चे संचालक प्रा. अनिल सहस्रबुद्धे आणि डॉ. विनय सहस्रबुद्धेंना पत्र लिहिले. त्यांनी लगेच ही संकल्पना उचलून धरली आणि मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांना भेटण्याचा सल्ला दिला. आम्ही सगळे जावडेकर यांच्या घरी गेलो. या वेळी डॉ. विनय सहस्रबुद्धे म्हणाले, ‘आमच्याकडे एक महान संकल्पना आहे. आम्हाला देशपातळीवर हॅकेथॉन आयोजित करायची आहे. देशातील सर्व तंत्रज्ञान संस्थांना सामावून घ्यायचे आहे. त्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाची मदत हवी.’’ 

पुढील वेळी या संकल्पनेविषयी अधिक जाणून घेऊयात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: abhay jere article Smart India Hackathon