esakal | बालक-पालक : सुख म्हणजे नक्की काय असतं?
sakal

बोलून बातमी शोधा

Book

बालक-पालक : सुख म्हणजे नक्की काय असतं?

sakal_logo
By
अभिजित पेंढारकर

सुट्टी संपायला आली होती. खरंतर सुटीचे भरपूर प्लॅन्स ठरले होते, पण काही ना काही कारणाने ते सगळे राहून गेले होते. एक योजना मात्र अगदी मनसोक्तपणे अमलात आली होती, ती म्हणजे भरपूर खेळण्याची. दोन्ही मुलांनी सुटीत भरपूर खेळण्याचा आनंद लुटला होता. सोसायटीमधल्या सगळ्याच मुलांना सुट्या होत्या, त्यामुळे खेळायला सवंगड्यांची कमी नव्हती, की उत्साहाची.

घरच्या आघाडीवर मात्र मुलांच्या समाधानाच्या पातळीवर काही फारसा उत्साह नव्हता. प्रत्येकाची काही ना काही मागणी पूर्ण करायची राहिलेली होती. धाकटीला यंदा cookies and cream आईस्क्रीम खायचं होतं. ते मिळायचं एकाच दुकानात, तेही घरापासून लांब. ते खाता आलं नाही, म्हणून तिची भुणभूण सुरू होती.

मोठ्याला एखाद्या रिसॉर्टवर राहायला जायचं होतं. तेही राहून गेलं.

‘अरे, दोनच महिन्यांपूर्वी मावशीच्या मुलाच्या लग्नासाठी एका मोठ्या रिसॉर्टवर चांगले दोन दिवस राहून आलात ना तुम्ही?’ आईनं आठवण करून दिली. त्याचा काही परिणाम होणार नव्हताच.

सगळ्यांनी एकत्र काहीतरी करायचं, हे टुमणं सुरूच होतं.

‘बिर्याणी करू का तुमच्या आवडीची? किंवा शेव बटाटा पुरी?’ आईनं ऑफर दिली. त्यानंही फार काही उत्साहाच्या लाटा आल्या नाहीत. वाटाघाटींना यश येईना. मुलांचं समाधान झाल्याशिवाय आईबाबांना चैनही पडत नव्हतं.

‘आपण एखादा सिनेमा बघायचा का, एकत्र?’ बाबांनी सुचवलं. मुलांनी टुणकन उडी मारली. आईनंही होकार दिला.

‘कुठला सिनेमा बघायचा?’ पुढचा प्रश्न आला आणि काही क्षण सगळेच शांत झाले. मग प्रत्येक जण आपापल्या आवडीचा सिनेमा सांगू लागला. धाकटीला कॉमेडी सिनेमा बघायचा होता, मोठ्याला हॉरर. आईला एखादा हलकाफुलका फॅमिली ड्रामा हवा होता, तर बाबांना सस्पेन्स बघायचा होता. त्यावर काही एकमत होण्याची लक्षणं दिसेनात.

रविवार दुपारची वेळ ठरली होती, पण जेवणं होईपर्यंत सिनेमा कुठला, यावर एकमत होईना.

सस्पेन्स..!’

‘हॉरर..!’

‘कॉमेडी...!’

प्रत्येक जण आपापली मागणी पुढे रेटू लागला. वाद मिटेना, तेव्हा बाबांनी आईला मध्यस्थी करायला खुणावलं, पण आईसुद्धा डोक्याला हात लावून बसली होती. बाबांनी मध्येच एक्झिट घेतली आणि कुठेतरी निघून गेले. बहुधा कंटाळून गेले असावेत, असं आईला वाटलं. बाबा पाच मिनिटांतच परत आले, ते हातात जुन्या अल्बम्सचं बाड घेऊन.

त्यांनी सगळे अल्बम्स समोर ठेवले. मुलांनी उत्सुकतेनं ते हातात घेतले आणि एकेक उलगडायला सुरुवात केली. दोन्ही मुलांचे बारश्याचे, बोरन्हाणाचे, वाढदिवसाचे असे फोटो होते. आईबाबांनी मुद्दाम सगळ्या फोटोंची प्रिंट काढून त्यांचे अल्बम्स जपून ठेवले होते.

‘आई, दादा बघ, नागडधुय्या!’ धाकटीनं दात काढत दादाचा एक फोटो दाखवला.

‘ही बघ शेंबडी...!’ दादानंही तिला चिडवून घेतलं.

फोटोंबरोबर शाळेच्या गॅदरिंगचे, मुलांच्या बाललीलांचे काही व्हिडिओ असलेल्या सीडीसुद्धा बाबांनी आणून ठेवल्या होत्या. त्याही बघताना पुन्हा धमाल उडाली आणि संध्याकाळपर्यंतचा वेळ मजेत गेला.

‘आजचा रविवार तर गेला. आता आपण पुढच्या रविवारी एकत्र सिनेमा बघू.’ बाबांनी सुचवलं.

‘नको बाबा, पुढच्या रविवारी ह्यातले उरलेले व्हिडिओ आणि फोटो बघू. खूप मजा येते हे बघायला!’ धाकटी म्हणाली आणि सगळ्यांनी माना डोलावून होकार दिला.