
बालक-पालक : वो भूली दास्तां...
‘‘माझे बाबा कधीच काही विसरत नाहीत!’’ छोटी नाक उडवून कुणालातरी फोनवर सांगत होती. आई शांतपणे ते ऐकत होती.
‘कुणाशी बोलत होतीस गं?’’ तिनं छोटीचा फोन संपल्या संपल्या विचारलं.
‘अगं, रेवाशी. ती सांगत होती, की तिचे बाबा एक नंबरचे विसरभोळे आहेत!’’ छोटीनं खांदे उडवले.
‘अच्छा? आपले बाबा कधीच काही विसरत नाहीत?’’
‘नाही.’’ छोटीचा आत्मविश्वास ओसंडून वाहत होता.
‘अगं, भाजी आणायला म्हणून बाजारात जातात आणि आपण कशासाठी आलोय, हे विसरून दुसरंच काहीतरी घेऊन परत येतात तुझे बाबा!’’ आईनं आता तिची शस्त्रं बाहेर काढली.
‘नाही हं...बाबा असं कधीच करत नाहीत! हो ना रे दादा?’’ छोटीनं दादाची साक्ष काढली.
‘बाबांनी या रविवारी बाहेर फिरायला नेण्याचं प्रॉमिस केलेलं दिसतंय. म्हणूनच त्यांची एवढी बाजू घेताय!’’ आईनं हे वाक्य उच्चारायला आणि बाबा घरी यायला एकच गाठ पडली.
‘बघ, त्यांचं ऐक जरा!’’ बाबांनी लगेच छाती फुगवून सांगितलं.
‘तुम्ही कधीच काही विसरत नाही. आज चिंगीनं येताना तिच्यासाठी स्केचपेन्स आणायला सांगितली होती, ती आणलीच असतील ना?’’ आईनं लॅपटॉपमधली नजरही वर न करता विचारलं आणि बाबांनी कपाळावर हात मारला.
‘काय झालं बाबा? आणलीत ना तुम्ही स्केचपेन्स?’’ चिंगी त्यांना चिकटत म्हणाली.
‘अगं...ते काय झालं... दुकानात गर्दी होती... बाहेर गाडी थांबवताच आली नाही. मी उद्या नक्की तुला घेऊन येतो हं!’’ असं म्हणत, आईकडे एक नजर टाकत बाबा आवरण्याच्या निमित्तानं आत गेले.
पुढचे दोन-तीन दिवस घरात हा विषय अधूनमधून डोकं वर काढत राहिला. बाबा अनेक गोष्टी विसरतात, यावर आई ठाम राहिली आणि बाबा कधीच काही विसरत नाहीत, यावर मुलं. चिंगीसाठी मधल्या काळात आई स्वतःच स्केचपेन्स घेऊनही आली होती, तेही चिंगी सोयीसोयीनं विसरून गेली.
‘आई, बाबा पूर्वी विसरायचे. पण हल्ली ते बदललेत.’’ पुन्हा कशावरून तरी बाबांचा विषय निघाला, तेव्हा मुलांनी किल्ला लढवला.
‘अगं, साधं घरातून दळण आणायला जाताना किती किलो हे सांगितलं असलं, तरी गिरणीतून तेच पुन्हा विचारायला फोन करतात तुझे बाबा!’’ आता मात्र मुलांना बाबांची बाजू लावून धरण्यासाठी आणखी जोर दाखवणं आवश्यक होतं.
‘तू उगाच काहीही सांगतेस. बाबा आता अजिबात विसरत नाहीत. बघूयाच!’’ मुलांनी आईला चॅलेंज केलं.
‘आत्ता काही क्षणांत आपल्याला उत्तर मिळेल.’’ आईनंही चॅलेंज स्वीकारलं. आईला आता फक्त बाबा बाहेरून कधी येतात, याची प्रतीक्षा होती. बाबा ज्या कामासाठी बाहेर गेलेत, त्यात काही विसरू नयेत, अशी त्यांनी मनातल्या मनात देवाची प्रार्थना केली. आज त्यांच्या ‘इज्जत का सवाल’ होता! थोड्याच वेळात बाबा परत आले.
‘बघ, बाबा आज काहीही विसरलेले नाहीत.’’ चिंगी उत्साहानं म्हणाली आणि दोन्ही मुलं त्यांच्या हातातल्या दळणाच्या पिशव्या घ्यायला धावली.
‘चार किलो दळण होतं ना? नेमके पैसे दिले. तुला फोन करून विचारलंही नाही. न विसरता घेऊन आलोय बघ!’’ बाबांनी अभिमानानं सांगितलं.
‘आपलं दळण मी कालच गिरणीतून घेऊन आले होते! तुम्ही आत्ता दळण आणायला नाही, पलीकडच्या बिल्डिंगमधल्या कुलकर्णीकाकांना भेटायला गेला होतात!’’ आईनं आठवण करून दिली आणि बाबा नुसते बघत राहिले...
Web Title: Abhijit Pendharkar Writes Balak Palak 15th December 2021
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..