विशेष : कायद्याचा अभ्यासक्रम व संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 court
विशेष : कायद्याचा अभ्यासक्रम व संधी

विशेष : कायद्याचा अभ्यासक्रम व संधी

- ॲड. जान्हवी भोसले

कायदेशीर अडचणींना तोंड द्यायचे झाले, की आठवण येते ती वकील मंडळीची. खासगी किंवा सार्वजनिक क्षेत्रात तसेच वैयक्तिक पातळीवरही कायदेशीर अडचणी सोडविण्यासाठी याच वकिलांची आवश्यकता भासते. न्यायालयात प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती ही वकील असते आणि कायदे क्षेत्रातील पदवी मिळवायची तर विधी शाखेचा (‘लॉ’चा) अभ्यासक्रम करावयास हवा. कायद्याच्या प्रवाहाचा भाग म्हणून एल.एल.बी. हा लोकप्रिय अभ्यासक्रम आहे. वकिली क्षेत्रात येण्यासाठी दोन प्रकारचे कोर्स आहेत. सर्व शाखांचे बारावी उत्तीर्ण व पदवीधर विद्यार्थी अनुक्रमे पाच वर्षांचे बी.ए., एलएल.बी. व तीन वर्षांचे एलएल.बी.चे शिक्षण घेऊ शकतात. परीक्षेचा फॉर्म ऑनलाइन पद्धतीने भरला जातो. तो अतिशय काळजीपूर्वक भरावा लागतो कारण, त्यात दुरुस्ती करणे शक्य नसते. तसेच, फॉर्ममधील चूक ही अर्ज रद्द होण्यास कारणीभूत ठरू शकते. प्रवेश परीक्षा ही मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये असते. बहुपर्यायी पेपर एकूण दीडशे गुणांचा असून दोन तास वेळ असतो.

ही परीक्षा कायदेविषयक व चालू घडामोडी, तार्किक आणि विश्लेषणात्मक कारणे, इंग्रजी व सामान्य गणित या विषयांवर आधारित असते. प्रामुख्याने भारतीय संविधान, भारतीय दंड संहिता, करार, टॉर्ट, फॅमिली लॉ, पार्टनरशिप अॅक्ट या कायद्यांवर प्रश्न विचारले जातात. यासाठी योग्य मार्गदर्शनासह नियमित अभ्यास करून सराव परीक्षा दिल्यास जास्तीत जास्त गुण मिळू शकतात. ‘सीईटी’मध्ये ‍उत्तम गुण मिळाल्यास हवे ते कॉलेज मिळण्यास मदत होते. अभ्यासक्रमातील प्रत्येक विषय हा महत्त्वाचा असून, त्याची सखोल माहिती घेणे गरजेचे आहे. त्यामुळे योग्य मार्गदर्शक असल्यास येणाऱ्या संधी जाणून त्याची तयारी कशी करावी हे समजण्यास मदत होते.

साधारणपणे प्रवेश परीक्षेचे अर्ज डिसेंबर ते जानेवारी दरम्यान सुरू होऊन परीक्षा मे ते जून दरम्यान होते. या परीक्षेच्या निकालापासून तुमची विधी लॉ अभ्यासक्रमाची सुरुवात होते.

या क्षेत्रात सामील होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना काही कौशल्य संच असणे आवश्यक असते. उदा. आत्मविश्वास, बोलण्याची स्पष्टता, तत्त्व समजावून घेण्याची क्षमता, विश्लेषण क्षमता, सादरीकरण, निर्णय घेण्याची तयारी.

एलएल.बी. उत्तीर्ण झाल्यानंतर वकिली सुरू करण्यासाठी ऑल इंडिया बार कौन्सिलची परीक्षा देणे गरजेचे आहे. ती उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करू शकता. वकिली हा व्यवसाय सुरुवातीपासूनच उत्तम करण्यासाठी अभ्यासक्रमाबरोबरच इंटर्नशिप करावयास हवी. यामुळे कोर्ट, लीगल लॅंग्वेज, प्रत्यक्ष कोर्ट प्रोसिजर यांची सखोल माहिती होते. तसेच अभ्यासक्रम पूर्ण करीत असताना दरवर्षी एक असे लॉ संबंधित डिप्लोमा करणे जरूरीचे आहे. उदा. सायबर लॉ, इटॅलेक्च्युअल प्रॉपर्टी, आर्बिट्रेशन, लेबर लॉ, इ. असे केल्यास वकिली व्यवसाय प्रभावी होण्यास मदत होते.

वकिलीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर न्यायाधीश, सरकारी वकील, इंडियन लिगल सर्व्हिसेस, भारतीय लष्कर, नौदल, वायुदलाच्या कायदेविषयक शाखांमध्ये, शिक्षण क्षेत्रात, विविध ट्रस्टमध्ये ट्रस्टी म्हणून, मल्टिनॅशनल कंपनी, बँक, लीगल फर्ममध्ये काम करू शकता.

टॅग्स :Opportunitylaw