ऑल इंडिया प्री मेडिकल स्कॉलरशिप टेस्ट

हेमचंद्र शिंदे
Monday, 30 December 2019

देशभरातील शासकीय तसेच खासगी महाविद्यालयातील प्रथम वर्ष एमबीबीएस तसेच बीडीएस शाखेत २०२०मध्ये देशपातळीवरील नीट-२०२० मधून प्रवेश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी घेण्यात येणाऱ्या AIBMST- ऑल इंडिया प्री मेडिकल स्कॉलरशिप टेस्ट (सेकंडरी २०२०) या परीक्षेचे ऑनलाइन अर्ज www.aibmstsecondary.co.in संकेतस्थळावर ३१ जानेवारी २०२० पर्यंत उपलब्ध आहेत.

वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक 
देशभरातील शासकीय तसेच खासगी महाविद्यालयातील प्रथम वर्ष एमबीबीएस तसेच बीडीएस शाखेत २०२०मध्ये देशपातळीवरील नीट-२०२० मधून प्रवेश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी घेण्यात येणाऱ्या AIBMST- ऑल इंडिया प्री मेडिकल स्कॉलरशिप टेस्ट (सेकंडरी २०२०) या परीक्षेचे ऑनलाइन अर्ज www.aibmstsecondary.co.in संकेतस्थळावर ३१ जानेवारी २०२० पर्यंत उपलब्ध आहेत.

शिष्यवृत्तीबाबत... 
देशातील वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये ही सर्वांत लोकप्रिय शिष्यवृत्ती परीक्षा असून, ती राष्ट्रीय पातळीवर दरवर्षी २०१२ पासून घेण्यात येत आहे. ही शिष्यवृत्ती निव्वळ गुणवत्तेवर आधारित असून अर्जदाराची जात, समुदाय, लिंग किंवा धर्म विचारात न घेता कोणत्याही पात्र विद्यार्थ्यांस मेरीटनुसार शिष्यवृत्ती उपलब्ध होते. एमबीबीएस अथवा बीडीएस शाखेतील प्रवेश नीट परीक्षेच्या माध्यमातून झाल्यानंतर म्हणजेच प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एआयपीएमएसटी परीक्षेतून प्राप्त केलेल्या मेरिट क्रमांकानुसार शिष्यवृत्ती उपलब्ध होते शासकीय प्रवेशासाठी पहिल्या १०० विद्यार्थ्यांना पूर्ण चार वर्षांसाठी शिक्षणशुल्क, ५०० विद्यार्थ्यांना एक वर्षाची ट्यूशन फी व उर्वरित दोन हजार विद्यार्थ्यांना स्टँडर्ड लॅपटॉप याचप्रमाणे खासगी महाविद्यालयात प्रवेश झाल्यानंतर १०० विद्यार्थ्यांना एक वर्षाच्या ५० टक्के शिक्षणशुल्क, ५०० विद्यार्थ्यांना एका वर्षाचे २५ टक्के शिक्षणशुल्क व २००० विद्यार्थ्यांना लॅपटॉप असे शिष्यवृत्तीचे स्वरूप असते. 

परीक्षेचे वेळापत्रक
देश पातळीवर घेण्यात येणाऱ्या या परीक्षेचे अर्ज ३१ जानेवारी २०२० पर्यंत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध आहेत. फॉर्ममधील दुरुस्ती दहा ते तेरा एप्रिल, ॲडमिट कार्ड २० एप्रिल नंतर व परीक्षेचा निकाल १३ जून २०२० रोजी जाहीर होईल. परीक्षेसाठी महाराष्ट्रामध्ये अमरावती, नागपूर व मुंबई या शहरांचा परीक्षा केंद्रात समावेश आहे. ही परीक्षा नीट २०२० परीक्षा ३ मे २०२० रोजी झाल्यानंतर होणार आहे. १० मे २०२० स्लॉट १, १७ मे २०२० स्लॉट २, २४ मे २०२० स्लॉट ३ व ३१ मे २०२० स्लॉट ४ अशा चार दिवशी (सर्व रविवार) दुपारी २ ते ५ या कालावधीत घेण्यात येणार आहे. 

शैक्षणिक पात्रता 
एआयपीएमएसटी- अखिल भारतीय प्री वैद्यकीय शिष्यवृत्ती परीक्षेसाठी १० + २ म्हणजेच बारावी परीक्षेत सर्व विषयात ६० टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. २०२० मध्ये बारावी परीक्षा देणारे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. शिष्यवृत्तीसाठी या परीक्षेत किमान १० हजार मेरिट क्रमांक प्राप्त करणे आवश्यक. 

अर्ज करण्याची पद्धत
संकेतस्थळावरून नोंदणी करणे, ऑनलाइन अर्ज भरणे, इमेजेस अपलोड करणे व त्या नंतर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड अथवा नेटबँकिंगच्या माध्यमातून शुल्क भरणे व अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट घेणे हे महत्त्वाचे टप्पे आहेत. जनरल व ओबीसी मुलांसाठी १२७५ रुपये, एससी व एसटी, पीएचसाठी १०७५ रुपये व सर्व गटांतील मुलींसाठी १०७५ रुपये परीक्षा शुल्क आहे. फॉर्म भरताना परीक्षेच्या चार पैकी कोणताही एक स्लॉट म्हणजेच परीक्षेचा दिनांक निवडल्यानंतर आपल्या आवडीनुसार तीन परीक्षा केंद्र नोंदविणे आवश्यक आहे. 

परीक्षा पद्धत
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व इंग्रजी कौशल्य व लॉजिकल रिझनिंग या चार विभागांमध्ये परीक्षा घेण्यात येते. प्रत्येक विषयासाठी ५० प्रश्‍न अशी एकूण २०० प्रश्‍नांची परीक्षा असेल. परीक्षेचा कालावधी ३ तासांचा आहे. सर्व प्रश्‍न वस्तुनिष्ठ प्रकारचे म्हणजेच चार पर्याय एक अचूक निवडा असे असतील. अचूक पर्याय नोंदविल्यास चार गुण अशी एकूण ८०० गुणांची परीक्षा आहे. निगेटिव्ह मार्किंग पद्धत असून प्रत्येक चुकीच्या पर्यायास एक गुण वजा केला जातो. 
शिष्यवृत्ती प्रक्रिया, मांडणी, वितरण व कोणी परीक्षा द्यावी या बाबत उद्या क्रमशः


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All India Pre Medical Scholarship Test