
अमरावती : नवीन शैक्षणिक धोरण व सीबीसीएसची अंमलबजावणी करणारे व त्यासाठी एकाच दिवशी ११ हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा प्रयोग करणारे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ महाराष्ट्रात पहिले आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने शैक्षणिक सत्र २०२२-२३ पासून सीबीसीएस प्रणालीनुसार नवीन अभ्यासक्रम सर्व विद्याशाखांत लागू केला आहे. त्याबाबत पाचही जिल्ह्यांतील सर्व महाविद्यालयांतील नियमित व सीएचबी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याकरिता एकदिवसीय ‘मास्टर ट्रेनिंग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी श्री. पाटील बोलत होते.
विद्यापीठातील डॉ. के. जी. देशमुख सभागृहात आयोजित कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. विकास चंद्र रस्तोगी, राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी, अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद, नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे आभासी पद्धतीने, तर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे, प्र-कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, एचआरडी केंद्राचे संचालक डॉ. प्रसाद वाडेगावकर, अधिष्ठाता डॉ. वैशाली गुडधे व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षणाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलल्याचे व्हिडिओ संदेशाद्वारे सांगितले. डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी सांगितले, विद्यापीठाने सर्व विद्याशाखांत सीबीसीएस लागू केले, हा युनिक रेकॉर्ड आहे. प्रधान सचिव डॉ. विकास चंद्र रस्तोगी म्हणाले की, दीड लाख शिक्षकांच्या माध्यमातून महाराष्ट्रात शैक्षणिक बदल घडणार आहे.स्वागतपर भाषण प्र-कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे, प्रास्ताविक कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, संचालन डॉ. वर्षा कुमार लोमटे व उपकुलसचिव डॉ. सुलभा पाटील यांनी केले.