esakal | शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

scholarship

शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतिम उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in आणि https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता अंतिम उत्तरसूचीच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार असल्याने राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या निकालाची प्रतीक्षा लागली आहे.

या परीक्षेसाठी एकूण सहा लाख ३२ हजार ६६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये इयत्ता पाचवीच्या तीन लाख ८८ हजार ४०५ विद्यार्थ्यांचा आणि इयत्ता आठवीच्या दोन लाख ४४ हजार २६० विद्यार्थ्यांचा समावेश होता. दरवर्षी प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी फेब्रुवारीमध्ये घेण्यात येणारी ही परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सातत्याने पुढे ढकलण्यात येत होती. अखेर ही शिष्यवृत्ती परीक्षा १२ ऑगस्ट रोजी ‌मुंबई वगळता संपूर्ण राज्यात झाली.

हेही वाचा: IND vs ENG: शेवटची कसोटी रद्द झाल्यावर BCCI ची ECB ला नवी ऑफर

या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या अंतरिम उत्तरसूचीसंदर्भात दिलेल्या मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तरसूची सुधारित केली आहे. या उत्तरसूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येणार आहेत. या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा निकाल तयार केला जाईल, अशी माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल येत्या काही दिवसांत जाहीर केला जाणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे.

loading image
go to top