
जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना २० ते २६ जून दरम्यान नियमित शुल्कासह अर्ज करता येणार.
दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी २० ते २६ जूनदरम्यान भरा अर्ज
पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना २० ते २६ जून दरम्यान नियमित शुल्कासह अर्ज करता येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रकटनाद्वारे दिली.
या परीक्षेस पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे (आयटीआय) ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहेत. विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज माध्यमिक शाळांमार्फतच भरावेत, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.
ऑनलाइन अर्ज भरताना मार्च-एप्रिल २०२२ च्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्याथ्यांना त्यांची परीक्षेतील माहिती ऑनलाइन घेता येईल. या परीक्षेस प्रथमत: प्रविष्ट झालेल्या व श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट २०२२ आणि मार्च २०२३ अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील. नियमित शुल्काने अर्ज भरण्याच्या कालावधीत कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असेही डॉ. भोसले यांनी सांगितले.
Web Title: Apply Form For Ssc Supplementary Examination Between 20th And 26th June
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..