कौतुक आणि निखळ कौतुक! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कौतुक

कौतुक आणि निखळ कौतुक!

डॉ. भूषण शुक्ल

आपले कौतुक ऐकायला आवडत नाही अशी कोणी व्यक्ती जगात असेल का? विशेषतः आपल्या जवळच्या लोकांपैकी कोणी कौतुकाची मोहोर उठवल्यास आपल्याला सर्व जग जिंकल्याचा आनंद होतो.

पण कोणाचे मनापासून कौतुक करायचे नाही असा एक मराठी बाणा आहे. ‘एवढे काय अटकेपार झेंडे लावले आहेत की कौतुक करायचं?’ असा एक मराठी पालकांनी विचारलेला प्रश्न मुलांना नामोहरम करून जातो. कौतुक केल्यावर मुले शेफरतात आणि डोक्यावर बसतात अशी भीती पालकांना असते. चुकीच्या गोष्टीचे, चुकीच्या वेळेस आणि चुकीच्या प्रमाणात कौतुक करणे टाळले तर मुले उगाच डोक्यात हवा घालून घेत नाहीत. योग्य कामासाठी आणि मनापासून केलेले कौतुक मुलांचा आत्मविश्वास वाढवतेच, पण त्यांच्या मनात कौतुक करणाऱ्या व्यक्तीबद्दल जास्त आत्मीयता निर्माण होते. अर्थात. आपले कौतुक करणारी व्यक्ती आपल्याला आवडणारच.

साधारणतः मुले लहान असताना त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे खूप लाड होतात. अचानक एका वयात हे प्रेमाचे आणि कौतुकाचे शब्द आटतात. मुलांकडून असलेल्या अपेक्षा खूप वेगाने वाढतात आणि वयात येणाऱ्या मुलांना शक्यतो टीका, सूचना किंवा टोमणेच ऐकावे लागतात. जो येतो तो काहीतरी तत्त्वज्ञान किंवा अक्कल शिकवायचा प्रयत्न करतो.

जाऊ तिथे उपदेश आम्हा

सांगतो कोणीतरी |

कीर्तने सारीकडे,

चोहीकडे ज्ञानेश्वरी ||

काळजी आमुच्या हिताची,

एवढी वाहू नका |

जाऊ सुखे नरकात आम्ही,

तेथे तरी येऊ नका |

ह्या भाऊसाहेब पाटणकर या शायराने लिहिलेल्या ओळी आपल्या वयात येणाऱ्या मुलांची मन की बात आहे यात मला शंका वाटत नाही.

मुले रोजच काहीतरी चांगले करत असतात. या अवघड आणि तणावाने भरलेल्या जगात, मुळीच मोकळा वेळ मिळत नसतानाही आनंद शोधून मुले जगतात. ही खरोखर चांगली गोष्ट नाही का? मुलांचा उत्साह, एखाद्या गोष्टीमध्ये मनापासून झोकून देण्याची प्रवृत्ती, नवीन मित्र करण्याचा उत्साह, वेगळे काहीतरी करून बघण्याची हिंमत हे सगळे रोज आपल्यासमोर घडत असते. मित्रांबरोबर मनसोक्त टाइमपास करून आलेले मूल घरात शिव्या खाण्याच्या तयारीने परत येते. अशावेळी ‘बरं झालं बाबा तुला मनापासून बोलण्यासाठी मित्र आहेत. एकलकोंडा असणं उगाच काळजी वाढवतं,’’ असं एका वाक्यात आणि हसऱ्या चेहऱ्याने पटकन सांगितल्यास मुले उत्साहाने दोन गोष्टी शेअर करतात.

येथे लक्षात ठेवण्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कौतुक मनापासून आणि निखळ असावे. त्याला अपेक्षांचे शेपूट लावल्यावर ते कौतुक न होता संकट होते. म्हणजे, ‘वा, यावेळेस इतिहासात छान मार्क मिळालेस,’ हे कौतुक. ‘आता खूप अभ्यास करा आणि पुढच्या परीक्षेत सर्व विषयात असेच छान मार्क मिळवा,’ हे जोडलेले अपेक्षांचे शेपूट. हे शेपूट लावल्याने मूळच्या कौतुकाचे माकड होते आणि असेल कौतुक नकोसे वाटते कारण ते कौतुक राहत नाही.

प्रयोग म्हणून एक आठवडाभर रोज निदान एका चांगल्या कृत्याचे निखळ कौतुक करून बघा. बिन शेपटीचे कौतुक केले की माणसे कशी खुलतात याचा एक अनुभव घेऊन बघा.

Web Title: Appreciation And Sheer Admiration Person

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..