Video : मनातलं : आजची सत्य परिस्थिती

आनंद महाजन
Wednesday, 4 March 2020

पालकांसाठी एक आवाहन 
आपल्या मुलांबरोबर तब्बल एक तास ‘न चिडता’ व ‘न ओरडता’ वेळ घालवावा. एकही नकारार्थी शब्द न बोलता मुलांशी संवाद साधावा, जमेल का?  या आवाहनात अजून एक ‘Twist’ ... पालकांनी त्या एका तासात एकदाही मोबाईलला हात न लावता व एकही फोन कॉल व व्हॉट्‌सअप न बघता मुलाला पुरेपूर एक तास द्यावा. या एका तासामध्ये काय करावे.

1) गप्पा मारणे
2) खेळ खेळणे (बैठे खेळ किंवा बॅडमिंटन, टेबल टेनिस.)
3) एकत्र जेवण करणे
4) न चिडता मुलाचा अभ्यास घेणे

मला जे नाही मिळालं, ते माझ्या मुलाला नक्कीच देण्याचा प्रयत्न करीन अशी प्रत्येक पालकाची इच्छा नक्कीच असते. मुलांना सर्व सुखसोयी देण्यात व त्याची तडजोड करण्यात पालक खूप ‘बिझी’ झाले आहेत. आई-वडील दोघेही नोकरी करतात. कामानिमित्त त्यांना अनेकदा दौऱ्यावरदेखील जावे लागते. ‘बिझी’ शेड्युलमुळे इच्छा असूनही मुलांसाठी वेळ काढता येत नाही. शाळेच्या अभ्यासाचा न संपणारा बोजा कमी व्हावा यासाठी शिकवणी लावली जाते. सकाळी लवकर उठून मुले शाळेत जातात. त्यानंतर शिकवणीलाही जातात.

म्हणजेच दिवसातून दोनदा शिक्षणाचा मारा मुलांवर होत असतो. बऱ्याच वेळा घराघरांत एक वाक्‍य ऐकायला मिळते, ‘आमच्या मुलांवर खूप लोड आहे.’ शाळा, ट्युशन, होमवर्क, प्रोजेक्‍ट वर्क, वेगवेगळे क्‍लासेस... त्यामुळे आता मुलांच्या कोमल मनावर तणाव जाणवत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुले आणि पालकांमध्ये जास्त संवाद होत नाही. कारण प्रत्येक जण गॅजेटमध्ये बिझी असतात. मुले आपल्या आईवडिलांशी बोलत नाहीत. त्यामुळे मुलांच्या मनातील प्रश्‍न व शंका मनातच राहतात आणि सखोल व विचारप्रवर्तक चर्चा क्वचितच होते. आजकाल जेवण करण्यासाठी मुलांना तब्बल ४५ मिनिटे ते एक तास लागतो. टीव्ही व मोबाईल बघता बघता नेहमीच्या आहारापेक्षा जास्त खाल्ले जाते. म्हणूनच मुलांमध्ये लहान वयात लठ्ठपणा जाणवत आहे.

यासाठी मुलांना व पालकांना एकत्र करता येणारा हा मेंदूचा व्यायाम बघून घेऊया. यासाठी लेखात दिलेला क्युआर कोड स्कॅन करावा लागेल. याचे फायदे असे आहेत :
१) डाव्या व उजव्या मेंदूने एकत्रित काम करणे.
२) मेंदूचे संतुलन साधता येणे
३) काहीतरी वेगळे करून दाखविण्याची क्षमता जागृत होणे.
४) मेंदूचे संतुलन साध्य झाल्यामुळे अभ्यास व काम अचूक लक्षात राहते. रोज फक्त दोन मिनिटे हा मेंदूचा व्यायाम केल्याने गंमत वाटते आणि मनाला विरंगुळाही मिळतो.

अभ्यास करण्याच्या पद्धती
१) एकदा वाचल्यास पटकन लक्षात राहते.
२) तीन ते चार वेळा लिहिल्यावरचे लक्षात राहते.
३) शांतपणे धडा दोन ते तीन वेळा वाचल्यावर लक्षात राहते,
४) जोरजोरात धडा वाचल्यावर लक्षात राहते.
५) बरीच मुलं अभ्यास करताना पेन्सिल फिरविणे किंवा पाय हलविणे किंवा दर दहा मिनिटांनी उठणे या पद्धतीने अभ्यास करतात.
६) काही मुलांना आजूबाजूला संगीत लावल्यास लक्ष केंद्रित करता येते. पालकांनी आपल्या मुलांची अभ्यास पद्धती जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यावर पुढील लेखात चर्चा करूयात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article anand mahajan on Todays true situation