मनातलं : सृजाण पालकत्व

parenting
parenting

पालकत्व हा विषय खूप आव्हानात्मक आहे. आपण नोकरी शोधायला जातो तेव्हा योग्यता, पदवी, गुणांची टक्केवारी या सर्व गोष्टींशिवाय तत्परता व हुशारीकडे बारकाईने बघितले जाते. या सर्व बाबींवर चाचणी झाल्यानंतरच निवड होऊन नोकरी आपल्याला मिळते. पालकत्व वेगळे आहे. पालक बनण्यासाठी वयाची मर्यादा याखेरीज कुठलीही बांधीलकी नाही. पालक बनल्यावर मुलांना मोठे करणे ही खूप मोठी जबाबदारी आहे. पालकत्व पूर्णवेळ नोकरी आहे. त्याचे कौशल्य आपण हळूहळू शिकतो.

बीज अंकुरण्यासाठी त्याची जोपासना करावी लागते. त्याला पोषक माती, खत, पाणी आणि सूर्यप्रकाशाची नितांत गरज असते. पोषक गोष्टी मिळाल्यावर त्या रोपट्याची मुळे हळूहळू खोलवर जाऊन भक्कम पाया निर्माण करतात. कालांतराने रोपट्याचे रूपांतर सुंदर झाडात होण्यास सुरुवात होते. हे झाड बहरते. त्याला सुंदर फुले, फळे येतात. त्या झाडाचे संगोपन लहानपणी उत्कृष्टरीत्या झाले असल्यास त्याचे काय फायदे होतील, ते पाहूया. 

असे होतील फायदे...
1) मुळे जमिनीत घट्ट पाया धरतील. 
2) कितीही वादळे आली झाड पडणार नाही. 
3) कडकडीत ऊन व धो धो पाऊस आला तरीही त्या सूर्यप्रकाशातून ऊर्जा आणि पावसाच्या पाण्यातून बळ घेऊन अजून उंच व मोठे आणि बहारदार होईल.
4) या झाडाच्या आयुष्यातले नवीन आव्हान प्रदूषण. या सगळ्यांना तोंड देत खंबीरपणे न डगमगता ताठ मानेने आपला डौलदारपणा दाखवत हे झाड आपल्यासमोर मोठे होते. असे सुंदर वृक्ष आपण स्वतः जोपासल्याचा आपल्याला अभिमान वाटतो. लहान मुलाला मोठे करणे आणि एका बीजाला वृक्ष बनवणे यामध्ये खूप साम्य आहे. बाळ लहान असताना (जन्मल्यावर) त्याची व्यवस्थित वाढ होण्यासाठी औषध, पौष्टिक आहाराची नितांत गरज असते. लहान मुले आपल्या आजूबाजूला काय होत आहे, याकडे काटेकोरपणे लक्ष देतात. हळूहळू त्यांना भाषा समजायला लागते.

यावेळी वृक्षरुपी मुलांचे मूळ भक्कम होण्यास काय करावे?
1) घरातले वातावरण सुखमय असावे. 
2) घरात वाद विवाद व तणाव टाळावा. 
3) आपण एक छान, बळकट वृक्ष बनणार आहोत, याचा विश्‍वास त्यांना द्यावा. 
4) अभ्यास हे एक मनासाठी खाद्य आहे, (खत आहे) याची जाणीव करून द्यावी. 
5) वाढत्या रोपट्याला सूर्यप्रकाशाची गरज आहे. तशीच मुलांना प्रेरणा देण्याची खूप जास्त गरज आहे. 
6)खत म्हणजे अभ्यास आणि सूर्यप्रकाश म्हणजे प्रेरणा. आपण फक्त अभ्यास, अभ्यास केले आणि प्रेरणा दिली नाही, तर काय होईल? प्रेरणादायी आणि अभ्यासू मुले तयार झाल्यास त्याचे भविष्य कसे राहील?

असे साकारेल भविष्य...
1) त्याचे आयुष्यातले ध्येय भक्कम राहतील. 
2) आयुष्यात कितीही आव्हाने, संकटे आली तरीही त्यांना सहज सामोरे जाण्याचे बळ आणि जिंकण्याची मनोवृत्ती बळकट राहील. 
3) झाड बहारदार होईल, तसेच मूल आपल्या करिअरमध्ये भरारी घेईल. 
4) झाडांची छाटणी केल्यावर त्यांना नवीन फांद्या फुटतात आणि डौलदार आकार देता येतो, तसेच मुलांना वेगवेगळी कौशल्य शिकवून त्यांच्या व्यक्तिमत्वाला डौलदारपणा देता येतो.

मूळ पाया भक्कम असल्यामुळे वाईट सवयी जवळपासही भटकणार नाहीत. नेहमी हसत, खेळत राहण्याची वृत्ती तयार झाल्यामुळे तणावाखाली येणार नाहीत आणि आपल्या छायेत दुसऱ्यांना सुख देण्याचे नेतृत्व गुण आपोआप निर्माण होतील. आपल्या मुलाचे सुंदर भविष्य घडविणे पालकांच्या हातात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com