esakal | भविष्य नोकऱ्यांचे : कृत्रिम बुद्धिमत्तेची अचूकता आणि व्यायसायिक वापर
sakal

बोलून बातमी शोधा

Job

कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत दोन प्रकारचे मतप्रवाह आहेत. एक गट कृत्रिम बुद्धिमत्ता सर्व प्रश्न सोडवू शकते या मताचा आहे, तर दुसरा या तंत्राच्या यशस्वीतेबाबत साशंक आहे. या संदर्भातील प्रश्न सोडविताना एक प्रश्न नेहमी विचारला जातो - ही प्रारूपे नेमकी किती अचूक उत्तरे देतील? आणि हा प्रश्न स्वाभाविक आहे. कारण जेव्हा ही प्रारूपे व्यवसायाच्या संदर्भातील निर्णय प्रक्रियेमध्ये वापरली जातात, तेव्हा चुकीची उत्तरे कशी हाताळावीत याबाबत योजना तयार करावी लागते.

भविष्य नोकऱ्यांचे : कृत्रिम बुद्धिमत्तेची अचूकता आणि व्यायसायिक वापर

sakal_logo
By
डॉ. आशिष तेंडुलकर

कृत्रिम बुद्धिमत्तेची प्रारूपे प्रत्येक वेळी १०० टक्के बरोबर उत्तरे देतीलच, असे नाही. ही प्रारूपे चुका करतात, तेव्हा नेमके काय केले जाते ते पाहूया. 

कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत दोन प्रकारचे मतप्रवाह आहेत. एक गट कृत्रिम बुद्धिमत्ता सर्व प्रश्न सोडवू शकते या मताचा आहे, तर दुसरा या तंत्राच्या यशस्वीतेबाबत साशंक आहे. या संदर्भातील प्रश्न सोडविताना एक प्रश्न नेहमी विचारला जातो - ही प्रारूपे नेमकी किती अचूक उत्तरे देतील? आणि हा प्रश्न स्वाभाविक आहे. कारण जेव्हा ही प्रारूपे व्यवसायाच्या संदर्भातील निर्णय प्रक्रियेमध्ये वापरली जातात, तेव्हा चुकीची उत्तरे कशी हाताळावीत याबाबत योजना तयार करावी लागते. सर्वसाधारपणे मनुष्य एखादे व्यावसायिक काम ज्या अचूकतेने करतो, ते काम संगणक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने किमान मनुष्याच्या पातळीपर्यंत करण्याची शक्यता असते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अर्थातच, आपण मनुष्याला उपलब्ध सर्व माहिती संगणकाला दिली तर! त्यापुढे जाऊन मी असे म्हणेन, की १०० टक्के अचूकता सर्वच  ठिकाणी अनिवार्य असतेच असे नाही. उदा. एखादे काम मनुष्यबळाकरवी ४० टक्के अचूकतेने होत असेल आणि संगणकाच्या मदतीने तेच काम ६० टक्के अचूकतेने होत असेल, तर अशा प्रणाली व्यवसायामध्ये फारच उपयुक्त असतात. या संदर्भात आपण चुकीची शक्यता ३३ टक्क्यांनी कमी केली, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक लाभ होण्याची शक्यता वाढते. तेव्हा सर्वकाळ कृत्रिम बुद्धिमत्तेकरून १०० टक्के अचूकतेचा आग्रह धरणे शहाणपणाचे नाही. 

मात्र, जेव्हा या प्रणाली त्यांच्या उत्तराबद्दल साशंक असतात, तेव्हा ते स्पष्टपणे सांगणे आवश्यक असते. उदा. प्रत्येक उत्तराबरोबर त्याच्या अचूकतेची शक्यता सांगितल्यास कोणत्या उत्तरावर बिनदिक्कत विसंबून राहायचे आणि कोणत्या उत्तराचा सावधपणे वापर करायचा याचा निर्णय वापरकर्ते घेऊ शकतात. चुकीची अधिक शक्यता असलेली उत्तरे मनुष्यबळाकरवी सुधारून घेणे किंवा ही उत्तरे बरोबर देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ताधारित प्रणाली अजून मजबूत करणे, यांसारखे पर्याय वापरले जातात. या प्रक्रियेमध्ये सांख्यिकी आधारित संकल्पनांचा वापर केला जातो.

उत्तराच्या अचूकतेच्या शक्यतेवरून त्या उत्तराचा वापर केल्याने संभावित लाभ आणि नुकसान यांचे ठोकताळे मांडता येतात आणि त्यावरून नेमके निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जातो. अशा युक्त्या आणि तंत्रे वापरून आज घडीला अनेक व्यवसाय कृत्रिम बुद्धिमत्ताधारित प्रणालीचा यशस्वी वापर करत आहेत. 

पुढील भागात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संदर्भातील नोकऱ्यासाठीच्या मुलाखतीच्या स्वरूपाविषयी बोलूया.