भविष्य नोकऱ्यांचे : बहुपदी प्रारूपाची ओळख

Job
Job

मागच्या तीन लेखामध्ये आपण कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालींचे काम नेमके कसे चालते याविषयी सखोल ऊहापोह केला. उतार किंवा चढाव प्रवणता हा पदांच्या प्रारूपाच्या उकलीतील एक महत्त्वाचा दुवा आहे. पुढील काही लेखांमध्ये आपण हे तंत्र बहुपदी प्रारूपांमध्ये कसे वापरतात याचा विचार करूया. प्रथम आपण बहुपदी प्रारूपांची ओळख करून घेऊया. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आत्तापर्यंत आपण अतिशय साधे आणि सरळ प्रारूप म्हणजे रेषीय प्रतिगमन याचा विचार केला. त्यासाठी आपण किंमत = अ x क्षेत्रफळ + ब असे प्रारूप वापरले. यामध्ये ‘अ’ आणि ‘ब’ला पदे असे म्हणतात. क्षेत्रफळ हे या प्रारूपातील वैशिष्ट्य (फिचर) आहे. उतार किंवा चढाव प्रवणता या तंत्राचा वापर करून दिलेल्या तालीम संचावरून प्रारूपातील पदांची उकल केली जाते. या प्रारूपामध्ये आपण फक्त एकाच वैशिष्ट्याचा वापर केला. परंतु व्यवहारात घराची किंमत निव्वळ क्षेत्रफळावर अवलंबून नसते, त्यामध्ये विविध गोष्टींचा किंवा वैशिष्ट्याचा विचार करावा लागतो. शयन खोल्यांची संख्या, प्रसाधनगृहांची संख्या, रेल्वे स्थानकापासूनचे अंतर, बस स्थानकापासूनचे अंतर, शाळेपासून किंवा इस्पितळापासूनचे अंतर इत्यादी. ही सर्व पदे समाविष्ट केल्यास आपल्याला बहुपदीय रेषीय प्रतिगमन प्रारूप मिळते. किंमत = अ * क्षेत्रफळ + प * शयनखोल्यांची संख्या + फ * प्रसाधनगृहांची संख्या + भ * रेल्वे स्थानकापासूनचे अंतर + म * बस स्थानकापासूनचे अंतर + त * शाळेपासून अंतर + ब. यामध्ये ‘अ’ , ‘प’, ‘फ’, ‘भ’, ‘म’, ‘त’ आणि ‘ब’ अशी सात पदे आहेत. हे नवीन प्रारूप घराच्या सहा वैशिष्ट्यांवर अवलंबून आहे. भूमितीयदृष्ट्या हे प्रारूप बहुआयामी प्रतलाच्या स्वरूपात दिसते. 

या प्रारूपातील पदांची उकल करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम तालीम संच तयार करावा लागेल. या तालीम संचामध्ये प्रत्येक घराबद्दलची सहा वैशिष्ट्ये आणि त्याची किंमत यांचा समावेश असणे आवश्यक आहे. आपण रेषीय प्रतिगामन पद्धतीमध्ये वापरलेल्या लॉस फंक्शनचाच येथे वापर करणार आहोत. ज (अ , अ , प, फ, भ, म, त , ब ) = (य - य*) x (य - य*) फरक इतकाच की आता ‘य’ हा बहुपदीय रेषीय प्रतिगमन प्रारूपातून मिळवावा लागतो आणि लॉस फंक्शन ‘ज’ हे आता ‘अ’ , ‘प’, ‘फ’, ‘भ’, ‘म’, ‘त’, ‘ब’ या सप्तपदीवर अवलंबून आहे. भूमितीयदृष्ट्या हे लॉस फंक्शन एका बहुमितीय खोलगट भांड्यासारखे असते. पुढील लेखामध्ये या पदांची उकल कशी करायचा याचा विचार करूया. त्याचबरोबर या प्रारूपांची काही उपयोजनांबद्दल चर्चा करूया. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com