संधी नोकरीच्या : अप्रेंटसशिप बेरोजगारांसाठी स्तुत्य उपक्रम

Apprenticeship
Apprenticeship

आयटीआय, डिप्लोमा, अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर या  क्षेत्रातील तरुणांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतरदेखील रोजगार मिळाला नाही, तर त्यावरचा एक रामबाण उपाय म्हणजे भारत सरकारचा अप्रेंटसशिप हा उपक्रम होय. भारत सरकार, राज्य सरकार यांच्या अखत्यारीतील व इतर खासगी कंपन्यांमध्ये एकूण कर्मचाऱ्यांच्या कमीत कमी २.५ ते १५ टक्क्यांपर्यंत अप्रेंटसशिपची भरती करणे कंपन्यांना बंधनकारक आहे.

अप्रेंटसशिप कायदा १९६१नुसार बेरोजगारांना विविध कंपन्यांत व्यावहारिक व ऑन द जॉब कौशल्य विकसित करण्यासाठी सुमारे एक वर्षापर्यंत प्रशिक्षण दिले जाते. तसेच, भारत सरकार व कंपनी यांच्यातर्फे प्रतिमाह भत्तादेखील देण्यात येतो. काही कंपन्या  प्रतिमहिना सुमारे १५,००० ते २०,००० रुपयांपर्यंत भत्ता देतात. त्यामुळे ही एकप्रकारे नोकरीच असते. अप्रेंटसशिपकडे विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांनी नोकरी या दृष्टीकोनातूनचच बघायला हवे. भारत सरकारच्या कौशल्य विकास व स्वयंरोजगार मंत्रालयातर्फे हा उपक्रम राबविला जातो. National Apprenticeship Training Scheme (NATS) व National Apprenticeship Promotion Scheme (NAPS) या उपक्रमांअंतर्गत बेरोजगार पदवी व पदविकाधारक यात सहभागी होऊ शकतात.

अप्रेंटसशिपचे विद्यार्थ्यांना फायदे
१. भारत सरकारतर्फे कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र. 
२. यातील साधारणपणे ६५ टक्के लोकांना नंतर त्याच कंपनीत पूर्ण वेळ नोकरी देखील दिली जाते. उपलब्ध नोकऱ्या व विद्यार्थ्याचे कौशल्य यांवर ते अवलंबून असते. 
३. सरकारी कंपन्या तसेच उत्तम दर्जाच्या खासगी कंपन्यांत खूप सहजतेने अप्रेंटसशिप व त्यानंतर नोकरी मिळविता येते. 
४. उद्योगात प्रत्यक्ष कामाचा अनुभव. 
५. बेरोजगारांसाठी एकप्रकारे ही नोकरीच असते.
६. एकाच वर्षात देशातील लाखो बेरोजगार याचा फायदा घेतात. 
७. अभियांत्रिकीच्या विदयार्थ्यांना कमीत कमी प्रतिमहिना ९,००० रुपये व डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना प्रतिमहिना ८,००० रुपये भत्ता मिळतो. 
८. या अनुभवामुळे इतर कंपन्यांत लगेच नोकरी मिळते.

ज्या कंपनीत चारपेक्षा जास्त लोक काम करतात अशा सर्व कंपन्यांना अप्रेंटसशिप देणे कायद्याने बंधनकारक आहे. बेरोजगारांना कौशल्य, ज्ञान, अनुभव व त्याबरोबरच पैसा मिळवून देण्याचा हा स्तुत्य उपक्रम भारत सरकारतर्फे खूपच चांगल्या पद्धतीने राबविला जातो. एकीकडे बरेचसे विद्यार्थी बेरोजगार असताना त्यांना इतक्या फायदेशीर उपक्रमाची माहितीच नसल्याचे व त्यामुळे खूपच कमी प्रमाणात विद्यार्थ्यांचा प्रतिसाद असल्याचे चित्र यामुळे दिसून येते. फार्मसी, आर्किटेक्चर,अभियांत्रिकी, डिप्लोमा, आयटीआय हॉटेल मॅनेजमेंट व इतर १६२ प्रकारच्या कोर्सेसचे उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात. तसेच सँडविच कोर्सेसचे शिक्षण घेणारे दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे विद्यार्थीदेखील यात सहभागी होऊ शकतात.

अप्रेंटसशिपचे कंपन्यांना फायदे
१. सरकारतर्फे प्रतिविद्यार्थी प्रतिमहिना सुमारे ४,५०० रुपये कंपनीला मिळतात. 
२. एक वर्षानंतर कंपनीत उपलबध जागांनुसार व विद्यार्थ्याच्या कामगिरीनुसारच पुढील निर्णय घेता येतो. 

अप्रेंटसशिपसाठी अर्ज कसा करावा
१.  www.apprenticeship.gov.in  वा www.mhrdnats.gov.in या वेबसाइटवर अर्ज करावा.
२. पदवीधर, कंपन्या व महाविद्यालये  हे तिन्ही या वेबसाइट्सवर नोंदणी करू शकतात. 

नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना लागणारी कागदपत्रे
१. आधारकार्ड, २. बँकेची माहिती, 
३. पदवीचे प्रमाणपत्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com