डिफेन्स सर्व्हिसेसमधील वेगळा दृष्टिकोन

डॉ. श्रीराम गीत
Friday, 15 November 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक
मागील लेखात डिफेन्स सर्व्हिसेसमधल्या प्रवेशाचे वेगवेगळे टप्पे व त्यातल्या स्पर्धेच्या कमीत कमी होत जाणाऱ्या तीव्रतेबद्दल थोडीफार माहिती आपण घेतली होती. आपण आज एका वेगळ्याच दृष्टिकोनातून त्याकडे पाहणार आहोत. गेली दहा एक वर्षे अगदी दहावी पास झालेल्या विद्यार्थीसुद्धा सहजपणे मला प्रश्‍न विचारतो म्हणजे, अमुकतमुक करिअरमध्ये पहिले पॅकेज (पगार नव्हे) कितीचे मिळते? आकडा ऐकल्यावर बहुतेक वेळा आईने पानात वाढलेल्या न आवडणाऱ्या भाजीकडे पाहून जसा चेहरा होतो तसा त्याचा चेहरा पाहण्याची आता मला सवयच झाली आहे.

पालकांची प्रतिक्रिया जरा संयत असते. एवढाच, इतकाच, त्यात कसे होणार हो वगैरे वगैरे. निदान स्वतःचा पहिला पगार आठवला तरीही प्रतिक्रिया वेगळी असू शकते. हे सारे लिहिण्याचे कारण म्हणजे डिफेन्समध्ये कमिशन्ड ऑफिसर म्हणून सर्वांत खालच्या पातळीवर दाखल होतो तेव्हा त्याचा पगार किती असतो याचे अज्ञान दूर करण्याचा हा एक प्रयत्न.

कमिशन्ड ऑफिसरची सीटीसी (कॉस्ट टू कंपनी) एकूण अठ्ठ्याहत्तर हजार रुपये महिना असते. शिवाय अन्य फायदे वेगळेच. खरे सांगायचे तर ‘आयआयटीतून’ पास होणाऱ्या एकूण इंजिनिअरांची सरासरी काढून पगाराचा आकडा पाहिला तरी हा आकडा दोन ते तीन लाखांनी जास्त असतो.

‘आयआयटीचा’ प्रवेश हे एक दुःस्वप्न बनत चालले आहे. मागच्याच लेखात पाहिल्याप्रमाणे किमान ६ ते ७ टप्प्यांवर जिद्दीने प्रयत्न करू शकणारा तगडा उमेदवार हे सुरेखसे पॅकेज मिळवण्यात यशस्वी होऊ शकतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नोकरी कायमची असते. 

एवढेच काय. पण जेसीओसाठीच्या विविध पदांसाठी इयत्ता बारावीनंतर विविध संधी उपलब्ध असतात. विशेषतः तांत्रिकी साऱ्याच क्षेत्रात डिफेन्समध्ये यांचेच प्राबल्य असते. शिक्षण विभागात म्हणजे आर्मी एज्युकेशन कोअरमध्येसुद्धा जेसीओ म्हणून किंवा तत्सम पदावर प्रवेश मिळवणाऱ्यांना छानसा पगार व अभिमानास्पद करिअर करता येते. 

अनेक विषयातील पदव्युत्तर पदवी घेतलेले यासाठी प्रयत्न करू शकतात. हा उल्लेख एवढ्यासाठी करत आहे की कायम शिक्षक, लेक्‍चरर्स ही पदे मिळणे संपूनसुद्धा एक दशक लोटले आहे. कंत्राटी शिक्षकांच्या किमान पाचपट या करिअरमधला पगार असतो. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वांना रडवणारा खर्च म्हणजे वैद्यकीय खर्च. तो डिफेन्समध्ये असा किंवा निवृत्त झाल्यावर सुद्धा पूर्णतः मोफत असतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr shriram git edu supplement sakal pune today