खेळातील स्पर्धा...

डॉ. श्रीराम गीत
Saturday, 16 November 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक
पूर्वी कधीही नव्हते इतके सध्या काही पालक व विद्यार्थी मुला-मुलींनी स्पोर्ट्समध्ये करिअर करावे याला प्रोत्साहन देताना दिसतात. याची दोन-तीन कारणे आहेत. पालकांची वाढती क्रयशक्ती व टीव्हीचे घराघरांत खेळ पोचवणारे आक्रमण. त्याच वेळी काही मोजक्‍या खेळाडूंना मिळालेले नेत्रदीपक यश व त्यातून येणारा पैसा हासुद्धा मोजक्‍यांना आकर्षित करतो.

इथेही आपला सध्याचा विषय येतोच येतो, स्पर्धा किती व कोणाशी? 
थोडक्‍यात, खेळ आवडतो म्हणून त्यातच करिअर करण्याचा हट्ट धरायचा का छंद, व्यायाम, फिटनेस म्हणून त्याकडे पाहायचे हा प्रश्‍न कधीतरी येतोच. मग आधीच्या त्यातील स्पर्धा समजून घेतली तर? हे खरे तर सहज समजून घेता येते. खेळ सांघिक आहे का वैयक्तिक हा झाला मुख्य भाग. सांघिक असेल तर संधी जास्त असे सोपे गणित इथे नसते. म्हणजेच क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, कब्बडी अशा खेळामध्ये संघातील खेळाडू जास्त असल्याने मला कोठेतरी संधी मिळेल असे मनात येऊन उपयोग नसतो.

साऱ्यांच्या लाडक्‍या क्रिकेटचे उदाहरण घेतले तर सचिन तेंडुलकर व राहुल द्रविड एकाच वयाचे, दोघेही उत्तम खेळाडू. पण राहुलची वर्णी लागली ती अचानक यष्टिरक्षकाची जागा भरायची गरज म्हणून. याउलट सध्याचा आपला यष्टिरक्षक पंत धोनीकडून आपल्याला पॅड्‌स कधी मिळणार याची वाट पाहताना दिसतो. सारेच अष्टपैलू असू शकत नाहीत, पण मुख्य कौशल्याच्या जोडीला मी काय करू शकतो याची ‘स्व’ ओळख करून घेणे इथे तीव्र स्पर्धेला तोंड देताना खूप गरजेचे राहते. अशीच एक जुनी आठवण म्हणजे भारतीय संघाला बळी मिळत नसताना अचानक सचिन तेंडुलकरच्या चेंडू हाती देऊन खेळाला मिळालेली कलाटणी. या साऱ्यांची नावे देण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्या काळात खेळात व जाहिरातीत अमाप पैसा असण्याचा काळ सुरू झाला नव्हता. कौशल्यातून स्वतःची जागा मिळवताना अतितीव्र स्पर्धा मात्र होती. 

स्पर्धा समजून घेताना अजून एक महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे त्या खेळाला आपल्या देशात असलेले ग्लॅमर किती? जितके ग्लॅमर जास्त तितकी स्पर्धा तीव्र, हे नक्की. कब्बडीपटूंचे राज्य म्हणून ओळखले जाणाऱ्या महाराष्ट्राचे नाव आता टीव्हीवरच्या कब्बडी स्पर्धांत शोधावे लागते. याउलट महिला कुस्तीपटूंची संख्या वेगाने वाढत आहे. एवढेच नव्हे, या दोन्ही खेळांत छान करिअर करणाऱ्या अन्य भारतीय राज्यांतील अनाम खेळाडू छान जमही बसवत आहेत. अन्य काही खेळांसंदर्भात पुढील लेखात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr shriram git edu supplement sakal pune today