ऑन एअर : नवीन माध्यमाची तयारी

RJ-Sangram
RJ-Sangram

माझ्या माध्यमाला सगळ्यात मोठा धोका नवीन माध्यमांपासून किंवा टेक्नॉलॉजीचा नसून माझं बोलणं आणि गाणी यांच्या मध्येमध्ये येणाऱ्या जाहिरातींचा आहे. ‘तुमची गाणी खूप सुंदर असतात पण जाहिराती जास्त होतात. तुम्ही खूप छान बोलता पण खूप कमी बोलता. मध्येमध्ये येणाऱ्‍या जाहिरातींमुळे रसभंग होतो, विषयाची लिंक तुटते,’ असा तुम्हा सगळ्यांचा सूर असतो. 

ही टीका रास्त आहे. सीझनमध्ये, म्हणजे सणासुदीचे दिवस, दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, ख्रिसमस; स्वातंत्र्य दिन, गणतंत्र दिवस यांसारखे राष्ट्रीय सण अशावेळी जाहिरातींचा अतिरेक होत असतो, हे खरं आहे. तो सगळ्याच माध्यमांवर होतो, आयत्यावेळी खरेदी कुठं करता येईल त्याच्या शोधात असलेले श्रोते सुद्धा या सेलच्या जाहिरातींचं स्वागतच करतात. पण वर्षातले हे वीस-पंचवीस दिवस सोडले तरी, इतर दिवशी सुद्धा जाहिराती जास्त असल्याची तक्रार होतच असते. पण याचा अर्थ आम्ही रेडिओवाले पैशाच्या मागे धावणारे, अरसिक, धंदेवाईक आहोत असं नाही.

रेडिओ वाहिन्या असा माल किंवा प्रॉडक्ट आहे, जिथं गिऱ्हाईक खरंतर गिऱ्‍हाईक नाही. कारण श्रोते पैसे खर्च न करता, म्हणजे फुकटच रेडिओ ऐकतात. त्याच्या बदल्यात त्यांनी जाहिराती ऐकाव्यात, असे हे बिझनेस मॉडेल आहे. जाहिरात देणारे या माध्यमाचे खरे गिऱ्हाईक ठरतात, कारण पैसे ते देतात आणि कस्टमर इज किंग या न्यायानं हे माध्यम जाहिरातदारासमोर थोडंसं झुकतं. तासाला पंधरा मिनिटं जाहिरातींचे पैसे दहा मिनिटातच मिळाले, म्हणजेच जाहिरातीचा दर वाढला, तर सगळ्यांचाच फायदा होईल.

कारण दहा मिनिटे जाहिराती या जवळजवळ पूर्ण ऐकल्या जातील, कारण एका मर्यादेनंतर जाहिराती ऐकल्याच जात नाहीत! हे पटवून देण्यात रेडिओ वाहिन्या कमी पडल्या आहेत, हे नक्की. पण हे वेळीच केलं नाही, तर सोन्याचं अंड देणारी ही कोंबडी आपण रोज कापतो आहोत आणि लवकरच तिची फक्त पिसं आपल्या हाती लागली आहेत, हे कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असेल! अर्थात एखादं माध्यम अचानक बंद पडलं आणि त्याला पर्यायच उपलब्ध नाही, असं होत नसतं. रेडिओला पर्याय म्हणून म्युझिक स्ट्रीमिंग ॲप्स बाजारात आलेत. स्मार्ट फोन आणि डेटा प्लान असल्यास कुठलंही गाणं कधीही ऐकता येतं. आता रेडिओ सारखंच त्याच्यावरही पॉडकास्टरूपी कार्यक्रम सुरू झाले आहेत. इथं मात्र डेटा बरोबरच त्या ॲपची फी भरावी लागते, साधारण ५०-१०० रुपये महिना. दोन गाण्यांमध्ये एकदा दोन मिनिटांसाठी बोलणं, मग तीन-चार मिनिटं जाहिराती, पुन्हा एक गाणं आणि मग तुम्ही एक दोन मिनिटं पुन्हा बोलणार हा रेडिओचा फॉरमॅट तिथं लागू होत नाही. पाच-दहा मिनिटांपासून ते तास-दोन तासाचे talk shows म्हणजे Podcast. 

या नवीन माध्यमात काम करायचं असल्यास नव्यानं तयारी केली पाहिजे. नवे स्किल शिकायला हवेत. प्रत्येक पॉडकास्ट हा एका विशिष्ट विषयावरती असतो. म्हणजे त्या विषयाचा सखोल अभ्यास असल्याशिवाय तुम्हाला तो सादर करता येणार नाही. ऑनलाइन रेडिओ किंवा पॉडकास्टसारख्या पर्यायी माध्यमांमध्ये देखील सखोल वाचन, चिंतन, चर्चा याला पर्याय नाही. 
तूर्तास पॉडकास्ट समजून घायचं असल्सास ते नक्की ऐका! 
1. Hidden Brain 
2. Freakonomics 
3. More Or Less 
4. Serial 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com