जपान आणि संधी : मूल्यांचे पालन हेच बलस्थान!

सुजाता कोळेकर
Thursday, 11 June 2020

जपानमध्ये, जपानी कंपनीमध्ये काम करायचे असेल किंवा जपानी कंपनीसोबत व्यवहार करायचा असल्यास जपानी संस्कृतीची माहिती करून घेणे अत्यावश्यक आहे.  जपानी भाषेबरोबरच जपानचे व्यवसाय कसे चालतात हे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळेच जपानने Business Japanese Proficiency Test (BJT) १९९६मध्ये सुरू केली. जपानशी निगडित काम करायचे असलेल्यांनी या टेस्टचा विचार नक्की करावा.

जपानमध्ये, जपानी कंपनीमध्ये काम करायचे असेल किंवा जपानी कंपनीसोबत व्यवहार करायचा असल्यास जपानी संस्कृतीची माहिती करून घेणे अत्यावश्यक आहे. जपानी भाषेबरोबरच जपानचे व्यवसाय कसे चालतात हे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळेच जपानने Business Japanese Proficiency Test (BJT) १९९६मध्ये सुरू केली. जपानशी निगडित काम करायचे असलेल्यांनी या टेस्टचा विचार नक्की करावा. या बरोबरच जपानची अनेक नीतिमूल्ये आहेत ती पावलोपावली पाहायला मिळतात. जपान अजूनही परदेशी लोक त्यांच्या लोकसंख्येच्या मानाने कमी आहेत. त्यांच्या लोकसंख्येचा जास्तीत जास्त भाग हा टोकियो, ओसाका, नागोया, कोबे अशा शहरांमध्ये आहे. त्यामुळे या शहरात खूप गर्दी आहे. एक भाषा, एक संस्कृती असा हा देश आहे. सामाजिक मूल्ये जपानमध्ये अगदी लहानपणापासून शिकवली जातात. त्यामुळे प्रत्येक जपानी माणूस या मूल्यांचे काटेकोरपणे पालन करतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जपानमधील व्यवसाय हे जागतिक पातळीवर यशस्वी होण्याची काही मूलभूत कारणे आपण आता पाहूया.
वक्तशीरपणा -

सगळेच जपानी लोक वेळेच्या बाबतीत खूप सजग असतात. कुठल्याही मीटिंगसाठी (वैयक्तिक किंवा व्यावसायिक) ते वेळेच्या आधी पोचतात. मीटिंगमध्ये १५ लोक असतील आणि मीटिंग ५ मिनिटे उशिरा सुरू झाली तर ७५ मिनिटे वाया गेली, असा विचार ते करतात. त्यामुळे एकूणच वेळेच्या बाबतीत सगळेच खूप सजग असतात. दुसऱ्याच्या वेळेला ते खूप महत्त्व देतात.

शिस्त -
जपानी शाळांमध्ये अगदी पाळणा-घरापासून शिस्तीचे धडे शिकवले जातात. त्यामुळे अर्थातच सगळेच जपानी लोक शिस्तप्रिय असतात. ही शिस्त प्रामुख्याने मेट्रो रेल्वे, बस, सुपर मार्केट, सहलीची ठिकाणे, शाळा आणि अशा इतर गर्दीच्या ठिकाणी पाहायला मिळते. सगळ्यांनीच शिस्त पाळायची ठरवली, तर सगळीच कामे सोप्पी होऊन जातात. 

स्वच्छता -
संपूर्ण जपान हा जगातील एक सुंदर आणि स्वच्छ देश आहे. जपानमधील नारिता एअरपोर्ट हे जगातील स्वच्छ एअरपोर्ट मानले जाते. काही कंपन्या आजूबाजूचा परिसर वारंवार स्वच्छ करतात. मुले आपली शाळा रोज स्वच्छ करतात. म्हणजे अगदी लहानपणापासूनच जपानमध्ये स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाते त्यामुळे संपूर्ण जपान स्वच्छ देश आहे. 

सभ्यता -
जपानमध्ये सभ्यता पावलोपावली पाहायला मिळते. कॉर्पोरेट मीटिंगमध्ये निर्णय घेताना सगळ्यांचा विचार केला जातो. त्यामुळे सगळ्यांनाच हा निर्णय आपण घेतला आहे, असे वाटते आणि मग सगळेच अंतिम लक्ष गाठण्यासाठी मदत करतात. त्यामुळेच जपानचे टिमवर्क नावाजलेले आहे.

देशप्रेम -
जपानमध्ये ११ मार्च २०११ला सुनामी आली होती, त्या भागातील लोक मुलाखत देताना एकच गोष्ट सांगायचे की, आम्ही परत नव्याने उभे राहू. जपानमध्ये प्रत्येक नागरिकांमध्ये देशप्रेम पाहायला मिळते. त्यामुळे कुठलेही संकट आल्यास सगळे एकमताने त्याचा सामना करतात. मोठ्या पदावरील व्यक्तीने घेतलेला निर्णय हा आपल्या हिताचाच असेल, असे मानून तो सगळेजण अमलात आणतात. त्याचा फायदा देशाला होतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article sujata kolekar on Japan and chance