Japan-Culture
Japan-Culture

जपान आणि संधी : जपानी संस्कृती

जपानमध्ये किंवा जपानी कंपनीत काम करण्याचे अनेक फायदे आहेत. टोकियो हे जगातील सर्वांत महाग शहर असल्यामुळे तिथे पगारही जास्त मिळतो, जपानमध्ये काम केले की, आपल्याला सर्वांत आधुनिक तंत्रामध्ये काम करण्याची संधी मिळते. तिथली जीवनशैली खूपच चांगली आहे. सर्वांत महत्त्वाचे, त्यांची आश्‍चर्यकारक आणि अविश्वसनीय संस्कृती.

स्वामी विवेकानंद यांनी असे लिहिले आहे, की प्रत्येक भारतीय युवकाने जपानला एकदा तरी जरूर भेट द्यावी. जपानची शिस्तप्रियता स्वच्छता आणि जपानी माणसांचे देशप्रेम त्यांना भावले होते. मी जपानला गेले तेव्हा अगदी पहिल्या आठवड्यात मला एका कंपनीमध्ये मीटिंगला जायचे होते.

माझ्याकडे असलेला पत्ता मी टॅक्सी ड्रायव्हरला जमेल तशा भाषेत सांगितला. कंपनीमध्ये पोचायला मला ४ मिनिटे उशीर झाला, तेव्हा त्या ड्रायव्हरने माझ्याकडून पैसे घेणे नाकारले. त्याचे म्हणणे होते, ‘तुम्ही माझ्या देशात पाहुण्या आहात आणि माझ्यामुळे तुम्ही वेळेवर पोचू शकला नाहीत, त्यामुळे मी तुमचे पैसे घेऊ शकत नाही. मला माफ करा!’ हा माझा अनुभव मला खूप काही सांगून गेला. 

जपानी लोकांचे देशावर खूप प्रेम असते, याची खूप उदाहरणे आपण वाचत असतो. मार्च २०११मध्ये सुनामी आल्यावर एक जपानी वृद्ध महिला, जी माझी शेजारीण होती, मला म्हणाली होती की आता जपान परत नव्याने लवकरच उभा राहील. वय वर्ष ८२ आणि विचार अगदी तरुणासारखे होते. हे ऐकून मला तिच्या देशप्रेमाची पावती मिळाली.

याच आजींना एकदा मी काही मदत हवीय का, असे विचारले होते तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘तू कंपनीमध्ये काम करतेस आणि तुला एक मुलगी आहे. घर सांभाळून सगळे करणे तुला अवघड होत असेल, मीच तुला मदत करेन.’ आणि खरंच त्या माझ्या मुलीला नातीसारखे खाऊ पिऊ घालत होत्या. ‘अतिथी देव भव:’ याचा खरा अनुभव मला या दोन प्रसंगातून मिळाला.

जपानी लोक खूप प्रामाणिक असतात. कुठेही कुणीही काही विसरले, तरी ते पोलिसांपर्यंत पोचवले जाते आणि तुम्हाला ओळख दाखवून ते परत मिळते.

मला भारतातल्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांने एक घटना सांगितली होती. ते जपानमधून येताना एअरपोर्टवर त्यांचा मोबाइल फोन हरवला म्हणून त्यांनी भारतातून एअरपोर्ट ऑफिसला ई-मेल केला, त्यांना एका दिवसात उत्तर मिळाले की तुमचा मोबाइल आमच्याकडे सुरक्षित आहे. तुमच्या पुढच्या विमानाचे वेळापत्रक कळवा आम्ही मोबाइल तुम्हाला देऊ. त्याप्रमाणे त्यांनी पुढच्या विमानाचे वेळापत्रक कळवले आणि ते एअरपोर्टवर पोचल्यावर एक व्यक्ती त्यांचा मोबाइल घेऊन उभी होती. 

जपानची लोकसंख्या कमी होत असल्यामुळे त्यांना भारतीय मनुष्यबळाची खूप गरज आहे. मग आपल्याच युवकांनी जपानी शिकून जपानला का जाऊ नये? मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे जपानी भाषेचे व्याकरण हे मराठीसारखेच आहे. त्यामुळे जपानी शिकायला आपल्याला सोपे जाते. त्यामुळेच ज्यांना मराठी लिहिता आणि वाचता येते त्यांनी जपानी शिकायला सुरुवात करायला हरकत नाही.

जपानला जाऊन काम करण्यासाठी किंवा जपानी कंपनीमध्ये कुठेही काम करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी अंगिकारल्या पाहिजेत. त्या म्हणजे, स्वच्छता, विनयशीलता, प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, शिस्त, आणि त्यांची व्यावसायिक संस्कृती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com