भविष्य नोकऱ्यांचे : ‘एआय’मधून नेत्रवैद्यकांना मदतीचा हात

डॉ. आशिष तेंडुलकर
Thursday, 3 December 2020

या वर्षातील शेवटच्या चार लेखांमध्ये आपण मज्जासदृश जालीय प्रारूपांद्वारे झालेल्या क्रांतिकारक कामांची ओळख करून घेऊया. मागील ७ ते ८ वर्षांमध्ये या प्रारूपांनी ‘एआय’ उपयोजनांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. या प्रारूपांच्या नानाविध रूपांनी मेडिकल सायन्स, मनोरंजन, माध्यमे, कृत्रिम दृष्टी (संगणक दृष्टी), कला, संगीत, जैवविविधता जोपासना, दुग्धव्यवसाय आदी क्षेत्रांमध्ये बहुमोल कामगिरी केली आहे. या कामगिरीचा आपण आढावा घेऊया.

या वर्षातील शेवटच्या चार लेखांमध्ये आपण मज्जासदृश जालीय प्रारूपांद्वारे झालेल्या क्रांतिकारक कामांची ओळख करून घेऊया. मागील ७ ते ८ वर्षांमध्ये या प्रारूपांनी ‘एआय’ उपयोजनांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. या प्रारूपांच्या नानाविध रूपांनी मेडिकल सायन्स, मनोरंजन, माध्यमे, कृत्रिम दृष्टी (संगणक दृष्टी), कला, संगीत, जैवविविधता जोपासना, दुग्धव्यवसाय आदी क्षेत्रांमध्ये बहुमोल कामगिरी केली आहे. या कामगिरीचा आपण आढावा घेऊया.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

साधारणतः चार वर्षांपूर्वी ‘गुगल’ने डायबेटिक रेटिनोपॅथी या डोळ्यांचा आजाराचे निदान करणारे ‘एआय’ प्रारूप विकसित केले. त्यावेळच्या अंदाजाप्रमाणे जगभरात ४१ कोटी ५० लाख लोक या आजाराने ग्रासण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. या आजाराचे वेळीच निदान झाले, तर त्यावर उपचार करून अंधत्व टाळता येऊ शकते. दुर्दैवाने, या आजाराचे निदान करणारे डॉक्टर जगभरात सर्वत्र उपलब्ध नाहीत. हा आजार शोधण्याच्या सर्वसाधारण पद्धतीमध्ये डोळ्याच्या मागच्या बाजूचे छायाचित्र घेण्यात येते आणि त्याच्या निरीक्षणावरून याचे निदान केले जाते. या छायाचित्रावरून निदान करण्यासाठी लागणारे पुरेसे मनुष्यबळ सर्वत्र उपलब्ध नसल्याने ‘एआय’चा यामध्ये वापर करता येईल, का असा विचार ‘गुगल’च्या एआय तज्ज्ञांना पडला. 

या वर्षभराच्या लेखमालेमध्ये वारंवार उल्लेख केल्याप्रमाणे असे कोणतेही ‘एआय’ प्रारूप तयार करण्यासाठी आपल्याला तालीम संचाची गरज भासते.  यामध्ये हा तालीम संच भारतीय आणि अमेरिकन डॉक्टर्सच्या मदतीने तयार करण्यात आला. प्रारूपांच्या तालमीसाठी १२८,००० नेत्र छायाचित्रे वापरण्यात आली. प्रत्येक छायाचित्राचे ३ ते ७ नेत्रवैद्यक तज्ज्ञांच्या मदतीने वर्गीकरण करण्यात आले. या पॅनेलमध्ये एकूण ५४ नेत्रवैद्यक तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. इथे मला पुन्हा एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे तालीम संच तयार करण्यामधला व्यवसाय तज्ज्ञांचा मौल्यवान सहभाग! आपण याविषयी अनेक लेखामध्ये विस्तृत चर्चा केली आहे.

सखोल मज्जासदृश्य प्रारूपांची या तालीम संचामार्फत तालीम किंवा ट्रेनिंग करण्यात आले.  असे हे प्रारूप १२००० छायाचित्रांवर तपासण्यात आले. ही छायाचित्रे ७ ते ८ अमेरिकन बोर्डाने प्रमाणित केलेल्या नेत्रवैद्यक तज्ज्ञांच्या एकंदरीत मतांवरून वर्गीकृत करण्यात आली. या छायाचित्रांवर तालीम झालेल्या सखोल मज्जासदृश प्रारूपांची चाचणी घेण्यात आली. या चाचणीमधून असे निदर्शनास आले की, या प्रारूपांची अचूकता डायबेटिक रेटिनोपॅथीचे निदान करणाऱ्या निष्णात नेत्रवैद्यक तज्ज्ञांपेक्षा अधिक आहे!  या प्रारूपांवर २०१८मध्ये पुढील सुधारणा करून ती नेत्रवैद्यक तज्ज्ञांना मदत करण्यासाठी काही निवडक इस्पितळांमध्ये वापरण्यात येत आहे.  

या प्रारूपांमुळे जगाच्या अनेक भागातील रुग्णांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. या प्रारूपांवरून सुरुवातीचे निदान झाल्यास असे रुग्ण नेत्रवैद्यक तज्ज्ञांकरवी त्याची खातरजमा करून योग्य ते उपचार वेळेवर घेऊन बरे होऊ शकतील. जगाच्या आणि मानवजातीच्या कल्याणासाठी ‘एआय’चा वापर अनेकविध अंगानी करण्यात येत आहे. पुढील तीन लेखांमध्ये आपण या विषयीची अधिक माहिती घेऊया!

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Write Dr Aashish Tendulkar on Future Jobs