esakal | आलेख : कोरोना आणि शिक्षण

बोलून बातमी शोधा

Map
आलेख : कोरोना आणि शिक्षण
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोरोनाच्या संसर्गामुळे उद्योगधंदे व देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले आहेच, मात्र त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे अतोनात हाल झाले आहेत. यंदा पहिलीत असलेले विद्यार्थी तर शाळेत गेले नाहीत आणि शिक्षकांना थेट न भेटताच दुसऱ्या इयत्तेत गेले आहेत! पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेताना मोठ्या त्रासाला तोंड द्यावे लागले आहे. गणितासारख्या विषयातील संकल्पना ऑनलाइन समजून घेताना त्यांना त्रास झाला आहे व त्यामुळे या विषयात ते भविष्यात मागे पडण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रीय बोर्डाने रद्द केल्या आहेत व आता महाराष्ट्रातही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असल्या, तरी महाराष्ट्रात या परीक्षा होणार अथवा नाही याबद्दल संदिग्धता आहे. अशा परिस्थितीत अभ्यास किती करावा, तो कधी पूर्ण करावा व सराव कधी करावा याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम आहे. कॉलेजेस बंद आहेत व पदवी मिळवूनही ‘कोरोना काळातील परीक्षा ऑनलाइन देऊन पास झालेला उमेदवार’ म्हणून भविष्यात नोकरी मिळवण्यात अडचणी येण्याची भीती या विद्यार्थ्यांना आहे.

देशभरात गेल्या वर्षभरात झालेले नुकसान प्रचंड मोठे असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाबरोबरच त्यांचे मोठे मानसिक नुकसान झाले आहे. कोरोनाच्या संसर्गाचा वाढता धोका पाहता यंदाचे सलग दुसरे शैक्षणिक वर्ष कसे सुरू होईल व ते कसे पुढे सरकेल याबद्दलची अनिश्चितता कायम आहे.